पंचवटी : प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन संबंधित कामे यापुढे वाहन डिलर्सनेच करावी, असे शासनाचे आदेश असल्याची संधी साधून तसेच आरटीओतील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने आरटीओत वाहनासंबंधातील कामे करणाऱ्या एजंटांना डावलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, यासंदर्भात शहरातील अनेक नामांकित वाहन डिलर्स एकत्र येऊन गोपनीय बैठक घेतल्याचे वृत्त आहे.
आरटीओत वर्षानुवर्षे एजंटचे काम करणाऱ्यांना हटविण्यासाठी दोन दिवसांपूर्वी शहरात दुचाकी व चारचाकी वाहन डिलर्स असोसिएशनची बैठक घेण्यात आली. त्यात यापुढे वाहन डिलर्स थेट आरटीओ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून एजंटगिरी करतील. यामागे मोठे ‘अर्थ’कारण असले तरी केवळ एजंटांना वाटेतून दूर करण्याचा प्रयत्न करून डिलर्स आरटीओ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहतील हाच बैठकीतील मूळ मुद्दा असल्याचे समजते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने नवीन वाहनसंबंधी सर्व कामे डिलर्सने करावे, असे अधिकार दिले त्यानुसार नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात डिलर्सने वाहनसंबंधी काम सुरू केले आहे. डिलर्सने एजंट माध्यमातून काम करतानाच यापुढे वाहन संबंधित कामांसाठी थेट आरटीओ अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून एजंटगिरी करावी असेच बैठकीत ठरल्याचे समजते. मात्र, नाशिक शहरातील काही वाहन डिलर्स काळ्या यादीत आहेत. त्यांचे अधिकार आरटीओ कार्यालयाने कमी केले होते त्यातून नवीन वाहन नोंदणी अन्य कामे प्रलंबित राहिले त्यामुळे आता बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या जागेवर नवीन अधिकारी येणार त्यामुळे आपल्या चुका लपविण्यासाठी काही डिलर्सने पुढाकार घेत आरटीओतील दोघा अधिकाऱ्यांना हाताशी धरून अशासकीय महसूल पुरविण्याचीही जबाबदारी घेत जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा एजंटांमध्ये होत आहे.