लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : ग्राम विकास विभागाने राज्यातील दहा गट विकास अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात मालेगावचे गट विकास अधिकारी आनंद पिंगळे यांची जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली तर चांदवड व देवळा या दोन्ही पंचायत समितीच्या गट विकास अधिका-यांची अदलाबदल करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा भरल्या गेल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपद काही दिवसांपासून रिक्त होते. शासनाने आता या पदावर मालेगावचे गट विकास अधिकारी आनंद पिंगळे यांची नेमणूक केली आहे. पिंगळे यांनी यापुर्वीही जिल्ह्यात काम केलेले असल्याने त्यांना ग्रामीण भागाची चांगली माहिती व प्रश्नांची जाण आहे. त्याच बरोबर विभागीय आयुक्त कार्यालयात सहाय्यक आयुक्त असलेले आर. ए. देशमुख यांची देवळा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी म्हणून तर देवळ्याचे गट विकास अधिकारी एम. यू. पाटील यांची चांदवड पंचायत समितीत गट विकास अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद गेल्या महिन्यापासून रिक्त असून, सध्या या पदाचा पदभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उज्वला बावके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. निवडणुकीपूर्वी या पदावर अधिका-यांची नियुक्ती होण्याची अपेक्षा होती परंतु त्याबाबतचे आदेश अद्याप काढण्यात आलेले नाहीत. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी आनंद पिंगळे यांनी आपला पदभार स्विकारला तत्पुर्वी जिल्हा परिषदेतून नाशिक महापालिकेत बदली झालेले सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी प्रदीप चौधरी यांना जिल्हा परिषदेकडून निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.