इंदिरानगर : बापू बंगला बसथांब्यानजीक भरणाऱ्या भाजीबाजाराचे साईनाथनगर चौफुली येथे स्थलांतर होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. रथचक्र चौक आणि बापू बंगला परिसर नो हॉकर्स झोन घोषित केल्याने आता वडाळा-पाथर्डी रस्ता मोकळा श्वास घेणार आहे. लाखो रुपये खर्च करून वडाळा-पाथर्डी रस्ता तयार करण्यात आला. परिसरातील शेकडोच्या संख्येने वाहनधारक रस्त्याचा वापर करतात. दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु सायंकाळ होताच बापू बंगला बसथांब्यालगत वडाळा-पाथर्डी रस्त्यावर भाजीविक्रेते हातगाड्या लावून व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांच्याकडे येणारे ग्राहकही आपली वाहने रस्त्यावर लावत असल्याने रस्ता जणू बंदच होत असे. वाहनधारकांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे बनले आहे. यामुळे लहान-मोठे अपघात होत आहेत. रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यासाठी नागरिकांनी नगरपालिका व नगरसेवकांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत तातडीने बांधकाम विभागाचे उपअभियंता जितेंद्र पोटिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांनी भाजीबाजाराची पाहणी केली. तातडीने ओट्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर सदर ओट्यांचे वाटप सोडत पद्धतीने भाजीविक्रेत्यांना करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
बापू बंगल्याजवळील भाजीबाजाराचे स्थलांतर
By admin | Published: April 20, 2017 12:41 AM