प्रस्थापितांना हादरा देत नवोदितांना मतदारांनी संधी दिली आहे. विजयी उमेदवारांनी व समर्थकांनी तहसील कार्यालयाच्या आवारात सकाळपासून गर्दी केली होती. निकालानंतर मोठा जल्लोष साजरा केला जात होता. दिवसभर या परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.कॅम्प रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. सोमवारी सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली. १६ टेबलवर ६ फेऱ्याद्वारे मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणीचा निकाल ऐकण्यासाठी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती. येथील पोलीस कवायत मैदानावर विजयी उमेदवार बाहेर पडताच गुलालाची उधळण करण्यात आली. विजयी मिरवणुकींना बंदी असली तरी गावागावांत विजयाचा मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. बहुतांश ग्रामपंचायतींवर कृषीमंत्री दादा भुसे यांचे वर्चस्व दिसून आले. शिवसेनाप्रणीत पॅनलने सत्ता कायम ठेवली आहे तर माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या समर्थकांनी ग्रामपंचायतींवर आपला झेंडा कायम ठेवला आहे. तालुक्यातील निमगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत कर्मवीर शिवराम हिरे पॅनल व कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीत ग्रामपंचायतीच्या पंधरा जागांपैकी १३ जागा कर्मवीर शिवराम हिरे पॅनलने पटकावल्या आहेत. कर्मवीर भाऊसाहेब हिरे पॅनलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले तर खाकुर्डी येथे पवन ठाकरे यांच्या ग्रामविकास पॅनलने नऊ जागा पटकावल्या आहेत. बाजार समितीचे उपसभापती सुनील देवरे यांच्यासह त्यांच्या पॅनलने सेनेचा झेंडा फडकवला आहे चंदनपुरी येथे शिवसेनेच्या दोन्ही गटांत सरळ लढत होती. या लढतीत सेनेचे विनोद शेलार यांच्या गटाने विजयश्री खेचून आणला तर झोडगे येथे दीपक देसले यांच्या आपलं पॅनेलने सत्ता पटकावली आहे. वऱ्हाणे येथे ग्रामविकास पॅनलने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी तरुणांना अधिक संधी दिल्याचे दिसून आले.
निमगाव, झोडगे ग्रामपालिकेत परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:17 AM