नाशिक : सुमारे साडेचार कोटी रुपयांच्या निधीतून वन्यप्राण्यांसाठी सुसज्ज असे रुग्णालय नाशकात साकारले जात आहे, याचा आनंद आहे. हे उत्तर महाराष्ट्रातील वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरणार आहे, कारण जसा माणसांचा जीव तसा वन्यप्राण्यांचाही जीव महत्त्वाचा आहे. वन्यप्राणी, पक्षी, कीटक हे सर्व जैवविविधतेमधील घटक सृष्टीचा एक भाग आहे. त्यामुळे पृथ्वी टिकविण्यासाठी सृष्टी जगविणे महत्त्वाचे असून हे त्याच्याच दिशेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.जागतिक वन्यजीव सप्ताहचे औचित्य साधत या उपचार केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन भुजबळ यांच्या हस्ते सोमवारी (दि.४) करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, तुषार चव्हाण, कार्यकारी अभियंता सिद्धार्थ तांबे, सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, भरत शिंदे, आनंद रेड्डी, ठेकेदार मंदार ठाकूर आदी उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्रातील पहिले वन्यप्राणी उपचार केंद्र (ट्रान्सिट ट्रीटमेंट सेंटर) नाशिक पश्चिम वनविभागाच्या वतीने जिल्हा नियोजन समितीने पुरविलेल्या निधीद्वारे म्हसरुळ शिवारातील वन विभागाच्या आगारात सुमारे दोन एकर जागेत उभारले जाणार आहे.यावेळी भुजबळ म्हणाले, जखमी वन्यप्राण्यांची शुश्रुषा करणे संकटात सापडलेल्या वन्यजीवांना आपला जीव धोक्यात घालून ह्यरेस्क्यूह्ण करणे, वणवे रोखणे, जंगलातील तस्करी रोखणे, असे सर्व काम वनखात्याकडून केले जाते व हे अत्यंत धोकादायक व जोखमीचे आणि तितकेच जबाबदारीचे काम आहे. यावेळी भुजबळ यांनी वनविभागाने प्रदर्शित केलेल्या रेस्क्यू साधनसामुग्रीची माहिती वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांच्याकडून जाणून घेतली. प्रास्ताविक गर्ग यांनी केले. सूत्रसंचालन वनक्षेत्रपाल मनीषा जाधव यांनी केले व आभार झोळे यांनी मानले.--असे असेल उपचार केंद्रकेंद्रात वन्यप्राणी शस्त्रक्रिया कक्ष, अतिदक्षता विभाग, एक्स-रे कक्ष, निरीक्षण कक्ष, औषधे, खाद्यपदार्थ भांडारगृह यासाठी बिबट्याकरिता आठ अद्ययावत असे ऐसपैस प्राणी संग्रहालयाप्रमाणे मोठे आठ पिंजरे, वाघासाठी दोन पिंजरे, तरस, कोल्हे, लांडग्यांसाठी पाच पिंजरे, तसेच या सर्व वन्यप्राण्यांना सुरक्षितरीत्या वावरता यावे यासाठी संवर्धन परिसरासह काळवीट, हरीण, माकड, वानरांसाठी प्रत्येकी दोन पिंजरे उभारले जाणार आहे.पक्ष्यांच्या जखमांवरही फुंकरजखमी वन्यप्राण्यांसह पक्ष्यांच्याही वेदनांवर या केंद्रात उपचाराची फुंकर घातली जाणार आहे. मोरासाठी एक स्वतंत्र पिंजरा, तर गिधाडासारख्या अन्य पक्ष्यांसाठी सात स्वतंत्र युनिट बांधण्यात येणार आहे. यामध्ये पक्ष्यांसाठी उड्डाण चाचणी युनिट असणार आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांसाठीसुद्धा प्रत्येकी एक युनिट असणार आहे.