कळवण : येथील पश्चिम भागात लॉकडाउनमुळे रस्ते सुनसान पडले आहेत. या शांततेचा फायदा उठवत बिबट्यांनी अन्न पाण्यासाठी आपला मोर्चा नागरी वस्त्यांकडे वळविल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने त्वरीत पिंजरे लावून सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.अभोणा परिसरातील बार्डे, दह्याणे, गोसराणे शिवारात शेतकरी बांधवांना सातत्याने बिबट्यांचे दर्शन होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असल्याने जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्वच व्यवहार शंभर टक्के बंद असल्याने सर्वत्र स्मशान शांतता पसरली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी शेती कामांकडे लक्ष केंद्रित केले आहे, मात्र शेतांमध्ये बिबट्यांचे दर्शन घडू लागल्याने भीती पसरली आहे. गोसराणे येथील दादाजी पाटील यांच्या घराजवळ बांधलेल्या शेळीचा बिबट्याने फडशा पाडल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. विश्वास मोरे यांच्या घराजवळील सीसीटीव्हीत बिबट्याचे दर्शन झाले. मात्र, त्यांचा गोठा जाळीबंद असल्याने जनावरे वाचली. ही घटना वनविभागाच्या कानावर टाकून पिंजरा लावण्याची मागणी केल्यानंतर अभोणा शिवारात पिंजरा लावण्यात आला आहे.गतवर्षी माझ्या शेतात ऊसतोड सुरू असताना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले होते. आता पुन्हा बिबट्याच्या दर्शनाने चिंता वाढली आहे. त्याच्या वास्तव्यामुळे मिल्चिंग पेपरसह मिरचीचे नुकसान झाले आहे. भीतीमुळे घरातून बाहेर निघायची कुणाची हिंमत होत नसल्याने शेती कामे खोळंबली आहेत. वनविभागाने या घटनेकडे गांभीर्याने बघून पिंजरा लावावा.- विश्वास मोरे, शेतकरी, गोसराणे
कळवणला नागरी वस्तीत बिबट्याचा संचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 10:32 PM