नाशिक : शहर बस सुरू करण्याची महापालिकेत तयारी झाली. राजीव गांधी भवनाच्या तिसऱ्या मजल्यावर परिवहन समिती आणि बससेवेसाठी केबिन्स तयार झाल्या. वाहकांनी दररोज तिकीट विक्रीतून तयार झालेले शुल्क भरण्यासाठी कॅशिअर केबिनदेखील तयार झाल्या. आता फक्त परिवहन समिती स्थापन होणार आणि बससेवा सुरू होणार एवढेच शिल्लक हेाते. त्यावेळी माशी शिंकली आणि परिवहन समिती रद्द झाली ती कायमचीच!
नाशिक महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट १९९२मध्ये आली. त्यावेळी अपक्षांच्या मदतीने काँग्रेस पक्षाची सत्ता होती. स्थायी समितीचे पहिले सभापती आणि ज्येष्ठ नगरसेवक उत्तमराव कांबळे यांचा शहर बससेवेबाबत विशेष आग्रह होता. महापालिकेत अर्थसंकल्प सादर करताना त्यात ब प्रकारात परिवहन समितीचे अंदाजपत्रक मांडायचा असतो. त्याबाबत वारंवार ते सांगत आणि अखेरीस परिवहन समितीसाठी काँग्रेस पक्षाला त्यांनी तयार केले. प्रकाश मते महापौर असताना म्हणजे १९९७ मध्ये परिवहन समितीची निवडणूक घेण्याचे ठरले. त्यानुसार तयारी करण्यात आली. काँग्रेस पक्षाने आंध्र प्रदेशमधील कार्यकर्ते या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. निवडणुकीसाठी विशेष महासभा बोलवण्यात आली असताना त्यादिवशी काँग्रेस अंतर्गत वाद वाढला आणि अखेरीस निवडणूक रद्द करण्यात आली आणि परिवहन समितीचा प्रस्ताव स्थगित करण्यात आला.
नाशिक महापालिकेच्या वतीने अशाप्रकारे बससेवा सुरू करण्याचे प्रस्ताव वेळोवेळी मांडण्यात आले; मात्र, महापालिकेतील विरोध आणि नागरिकांनाही पुरेशी खात्री नसल्याने हा विषय अनेकदा चर्चेत आला आणि नंतर मात्र वेळोवेळी हा विषय बारगळला. डॉ. शोभा बच्छाव, विनायक पांडे, यतीन वाघ अशा अनेकांच्या महापौरपदाच्या कारकिर्दीत बससेवेच्या हालचाली सुरू झाल्या आणि नंतर मात्र प्रस्ताव बारगळले.
इन्फो...
इंदूर दाैरा झाला; पण...
विनायक पांडे महापौर असताना बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्यावेळी पदाधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींनी इंदूरमध्ये दौरा केला. इंदूरमध्ये यापूर्वी शासकीय सेवा नसल्याने महापालिकेने सुरू केलेल्या तेथील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, नाशिकमध्ये ही सेवा सुरू होऊ शकली नाही.
इन्फो...
बीआरटीएसवर राज ठाकरेंनी मारली फुली
महापालिकेत मनसेची सत्ता असताना बससेवेचा प्रस्ताव पुढे आला. त्यावेळी शहरातील काही वास्तुविशारद आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आयटीडीपी या संस्थेच्या माध्यमातून बीआरटीएस ही संकल्पना राबविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अहमदाबाद येथे दौरादेखील करण्यात आला. मात्र, बससेवेसाठी लागणारे डेडिकेटेड रूट तयार करण्याइतपत नाशिक शहरातील रुंद रस्ते नसल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यावर फुली मारली होती.