नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये कृषीसंबंधित बियाणे, खते, कापणीयंत्र व वाहतूक यासंदर्भात कुठल्याही प्रकारची बंदी लादलेली नाही. त्यामुळे कृषी व कृषिपूरक उद्योगांशी संबंधित सर्व सेवा सुरळीतपणे चालू राहणार असून शेतकरी, व्यापारी व ग्राहकांनी गर्दी न करता निर्भय राहून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. नाशिकच्याजिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व शेतीपूरक उद्योग यांना लॉकडाउनमध्ये येणाऱ्या अडचणीसंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे व पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. दादा भुसे म्हणाले, प्रत्येकाने स्वत:ची आणि देशाची काळजी घेतली पाहिजे. सद्यस्थितीत घाबरून जाण्यासारखी कुठलीही परिस्थिती नाही. नागरिकांनी शासन प्रशासनास समन्वय व सहकार्य केल्यास या कोरोनाच्या संकटाचा सक्षमपणे सामना करू शकतो. जिल्ह्यात कलम १४४ लावल्यानंतर शेतीसंबंधित बियाणे व खते व्यवसाय, शेतीपूरक उद्योग व्यवसाय यांची वाहतुकीत काही अडथळे निर्माण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतीविषयक कुठल्याही कामकाजाच्या वाहतुकीत अडथळा येणार नाही यासंदर्भात प्रत्येक प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांना सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार आरटीओने जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांना आॅनलाइन परवाने व स्टिकर देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचा लाभ सर्व संबंधितांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. संपूर्ण देशभर अशा प्रकारची वाहतूक अत्यावश्यक कामांसाठी सुरू असून कृषी मालवाहतुकीसाठी नाशिक जिल्ह्याला जोडल्या गेलेल्या मुंबई, पुणे या जिल्ह्यांच्या सेवा सुरू राहतील. त्याचप्रमाणे आवश्यकतेनुसार मालाचा पुरवठा करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे. दरम्यान, काही द्राक्षे निर्यात झाली असली तरी काही बागा काढणीला आहेत. यासंदर्भात द्राक्षे बागायतदार महासंघाशी व शेतकऱ्यांशी चर्चा झाली असून त्यांचे कंटेनर्सद्वारे वाहतुकीचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनास दिल्या असून स्थानिक पातळीवर द्र्राक्ष वाहतूक करण्यास कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. जनतेला अन्नधान्य, भाजीपाला, फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, घाबरून न जाता कुठल्याही प्रकारची साठेबाजी करू नका, असे आवाहन भुसे यांनी नागरिकांना केले आहे. यावेळी खासदार डॉ. भारती पवार, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज अहिरे, माजी आमदार अनिल कदम, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कृषी , कृषिपूरक उद्योगांशी संबंधित वाहतूक सुरू राहणार ; दादा भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 8:01 PM
नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी व शेतीपूरक उद्योग यांना लॉकडाउनमध्ये येणाऱ्या अडचणीसंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे व पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्यासह बैठक घेऊन चर्चा केली.
ठळक मुद्देकृषीसंबंधित बियाणे, खते, कापणीयंत्र व वाहतूक बंदी नाहीकृषिपूरक उद्योगांशी संबंधित सेवा सुरळीत सुरू राहणार