नाशिक : रिक्षांमधून होणारी अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी ठोस पावले उचलली असून, त्यांनी मंगळवारी (दि.२८) बोलविलेल्या रिक्षा संघटना चालक-मालकांच्या बैठकीत भूमिका स्पष्ट केली. परवान्यानुसार प्रवासी वाहतूक केली जावी, अन्यथा संबंधित रिक्षाचालक-मालकावर कठोर कारवाई के ली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस आयुक्तालयात मंगळवारी शहरातील रिक्षा युनियनचे पदाधिकारी, मालक, चालक व वाहतूक विभागाचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आयुक्तांनी केलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आश्वासन यावेळी रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेनंतर नांगरे-पाटील यांनी प्रत्येक रिक्षाचालक आता परमिटनुसारच तीनच प्रवाशांची वाहतूक करेल, बेशिस्त रिक्षाचालक, परवाना, बॅच नसलेले तसेच रिक्षा परमिट नसलेल्या रिक्षा, मुदत बाह्य रिक्षा, शहराचे परमिट नसलेल्या रिक्षा, बेकायदेशीर नोंदणी केलेल्या रिक्षा यांसह ओला, उबेर टॅक्सीमध्ये बेकायदेशीररीत्या करारनामक करणाºया रिक्षा चालक-मालक यांच्यावर शहर वाहूतक शाखेचे विशेष लक्ष असून रिक्षा तपासणीच्या विशेषे मोहिमेद्वारे संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे नांगरे-पाटील यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले, माधुरी कांगणे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहायक आयुक्त मोहन ठाकूर, रिक्षा युनियनचे हैदर सय्यद, भगवान पाठक, इरफाण पठाण, वाहतूक विभागाचे सर्व पोलीस निरीक्षक, रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.ट्रॅव्हल्स बसेसला कन्नमवार पुलाखाली थांबाशहरातील विविध ट्रॅव्हल्सचालकांनी त्यांच्या बसेस शहरातील द्वारका, मुंबईनाका, जलतरण तलाव सिग्नल, दादासाहेब गायकवाड सभागृहामागे आदी भागात कोठेही उभ्या न करता कन्नमवार पुलाखाली महापालिकेकडून उपलब्ध करून दिलेल्या भुखंडावर उभ्या कराव्या, असे स्पष्ट आदेश नांगरे-पाटील यांनी या बैठकीत दिले. ट्रॅव्हल्स बसेसमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून, त्यासाठी हा तोडगा काढण्यात आल्याचे ते म्हणाले. अन्य ठिकाणी खासगी बसेस उभ्या असल्याचे आढळल्यास कारवाईचे आदेश देण्यात आले आहे.
रिक्षाचालकांनी परमिटनुसार करावी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 12:41 AM