सटाणा येथील ट्रामा केअर सेंटरच्या उद्घाटनानंतर कोनशिलेची तोडफोड करताना भाजपा कार्यकर्ते.
सटाणा : चार वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत शहरातील ट्रामा केअर सेंटरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने सेनेच्या गळ्यात गळा घालून आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांच्या हस्ते उद्घाटन केले. मात्र दोन तासांनंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांचे कोनशिलेवर नाव न टाकता नाव चिटकवून दिल्याचे उघड झाल्याने संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कोनशीलेची तोडफोड केली.शहरातील ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम पूर्ण होऊन चार वर्ष झाले. त्यानंतर यंत्रसामग्री आणून व काही पदे भरून हे सेंटर कार्यान्वित करण्यात आले होते. आज राष्ट्रवादीच्या आमदार दीपिका चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. सोहळ्याची केंद्रीय मंत्री डॉ.सुभाष भामरे यांना कोणतीही माहिती न देता आरोग्य मंत्र्यांची दिशाभूल करण्यासाठी प्रमुख कोनशिलेवर नाव न टाकता ते केवळ चिटकवल्याचे उघडकीस आल्याने दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव , महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सरोज चंद्रात्रे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निलेश पाकळे, शहराध्यक्ष मंगेश खैरनार, नगरसेवक महेश देवरे यांच्यासह शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांनी ट्रामा केअर सेंटरवर हल्लाबोल केला. यावेळी डॉ.शेषराव पाटील, जीवन सोनवणे, डॉ.आशिष सूर्यवंशी, जिभाऊ कोर, महेंद्र पवार, दीपक धिवरे, सागर अहिरे, हेमंत भदाणे, कल्पना पवार, रेणू शर्मा, रु पाली पंडित, दादा पहिलवान, लता सोनवणे आदी उपस्थित होते.कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून उद्घाटनाचा चिटकवलेली बोर्ड फाडून टाकला. त्यानंतर मूळ कोनशिला उखडून संताप व्यक्त केला. ट्रामा केअर सेंटर व आमदार दीपिका चव्हाण, माजी आमदार संजय चव्हाण यांचा कुठलाही संबंध नसून माजी आमदार उमाजी बोरसे, माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी पाठपुरावा केल्यामुळे ट्रामा केअरचे काम मार्गी लागले. परंतु जनतेची दिशाभूल करण्यासाठी चव्हाण दाम्पत्य श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप डॉ. बच्छाव यांनी केला.