मातोरी : गावातील व्यावसायिकांकडून गावात कचरा टाकला जात असून, त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. गावातील काही व्यावसायिकांनी नव्याने हॉटेल्स थाटली असून, व्यवसाय जोमात होत आहे. परंतु दिवसभर जमा होणारे खरकटे, प्लॅस्टिक, कागदी कचरा आदी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केली नसल्याचे दिसत आहे. सर्व कचरा स्मशानभूमीलगतच्या नाल्यात टाकला जात आहे. अनेकदा स्थानिकांनी ही बाब ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली मात्र पंचायत दुर्लक्ष करत आहे. कचºयाचे ढीग साचल्यामुळे गावात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रस्त्याने फिरणे मुश्कील झाले आहे. हॉटेल व्यावसायिक व स्थानिक शेतकरी यांच्यात कचरा टाकू नये यावरून वारंवार वाद होतात. स्वच्छ अभियानाच्या मोहिमेस मातोरी ग्रामपंचायतीने केराची टोपली दाखविल्याचे बोलले जात आहे. याबाबत योग्य ते पावले ग्रामपंचायतीने उचलावे. गावात असल्या व्यावसायिकांसाठी कचराकुंडीची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. हॉटेल व्यावसायिकांची अन्न सुरक्षा प्रशासनाने तपासावी, अशी मागणी होत आहे.
मातोरी गावात हॉटेल व्यावसायिकांकडून कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:37 AM