नाशिक : राज्य परिवहन महामंडळाने एस.टी. बस प्रवासाची भाडेवाढ केल्यामुळे शिवशाही बसचा प्रवासदेखील महागणार असून, शहरातील बसभाड्यातदेखील सहा ते दहा रुपयांनी वाढ होणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून सदर भाडेवाढ लागू होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या सेवांच्या भाड्यात वाढ करण्याला राज्य परिवहन प्राधिकरणाने मान्यता दिल्यानुसार महामंडळाने भाडेवाढ जाहीर केली आहे. शहरातील अंतर्गत बससेची संख्या महामंडळाने कमी केल्यामुळे प्रवाशांना पर्यायी साधनांचा वापर करावा लागत असला तरी नाशिकरोड, भगूर, कॅम्प, पंचवटी, सिडको, सातपूर, त्र्यंबकेश्वर या मार्गावरील बसेसला प्रवाशांना प्रचंड प्रतिसाद आजही कायम आहे. या मार्गावरून बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता सहा ते दहा रुपये इतके जादाचे भाडे द्यावे लागणार आहे. लहान मुलांच्या तिकीट दरातदेखील पाच रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते असा अंदाज आहे. महामंडळाने अद्याप शहरातील अधिकृत टप्पानिहाय भाडेवाढ कळविली नसली तरी सहा ते दहा रुपयांपर्यंतची वाढ नक्कीच मानली जात आहे. महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बसेसने प्रवास करणाºयांची संख्या वाढल्याने महामंडळाच्या उत्पन्नाला हातभार लागला आहे. सदर भाडेवाढ काही प्रमाणात जादाची असल्याची प्रतिक्रिया उमटत असल्या तरी प्रवासी या बसने प्रवास करीत आहेत. मुंबईला जाणाºया निमआराम बसचे भाडे २६७ असून, आता ते ३१५ होणार आहे. पुण्याचे भाडे ३०८ वरून ३५५, औरंगाबादचे भाडे २९१ वरून ३४५, बोरिवली २६७ वरून ३१५, तर धुळ्याचे भाडे २३१ वरून २७५ इतके होणार आहे. नाशिक ते पुणे (निमआराम) विनावाहक सेवा व शिवनेरी सेवेकरिता ठोक भाडे आकारण्यात येणार आहे.शिवशाहीचा प्रवासदेखील महागणार असल्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकहून पुण्याला जाणाºया शिवशाहीचे सध्याचे भाडे ३४६ रुपये इतके होते ते आता ४११ इतके होणार आहे. मुंबईचे भाडे ३०१ वरून ३४५, औरंगाबादचे भाडे ३२९ वरून ३७५, बोरिवलीचे भाडे ३०१ वरून ३४५, तर धुळे शिवशाहीचे सध्याचे भाडे २६६ असून नवीन भाडे ३०० रुपये होणार आहे. याप्रमाणेच रातराणी, निमआराम आणि सर्वसाधारण जलद बसेसच्या भाड्यातदेखील वाढ होणाार आहे.
भाडेवाढ केल्यामुळे शिवशाहीचा प्रवासही महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:39 AM