वणी : दिंडोरी तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सतर्क प्रशासकीय यंत्रणेवर कामकाजाचा अतिरिक्त ताण पडत असला तरी वणीतील ३० बेडच्या कोविड सेंटरमध्ये ४२ बाधितांवर उपचार सुरू आहेत.दिंडोरी तालुक्यात शासनाचे एकमेव कोविड सेंटर वणी येथे कार्यान्वित आहे तर तालुक्यातील खासगी कोविड सेंटरची संख्या पाच अशी आहे. ५० बेड क्षमता असलेल्या कोविड सेंटरचे काम दिंडोरी येथील आयटीआयच्या इमारतीत सुरू करण्यासाठी प्रशासन सक्रिय आहे. लवकरच हे कोविड सेंटर कार्यान्वित होऊन तालुक्यातील बाधितांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. सद्यस्थितीत वणीच्या कोविड सेंटरमधे ४२ बाधितांवर उपचार सुरू आहेत.१८ ऑक्सिजन सिलिंडरच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत. तर ड्युरा दोन जम्बो ऑक्सिजन यंत्रसामग्रीच्या माध्यमातून ऑक्सिजन उपलब्धतेनुसार उपचार प्रणाली करण्याबाबत आरोग्य विभाग कार्यरत आहे. रिझर्व ऑक्सिजन ठेवण्याच्या तरतुदीसाठी अखंडित ऑक्सिजन पुरवठा होणे अपेक्षित व गरजेचे आहे. दररोज दाखल रुग्णांची संख्या, त्यांची तपशीलवार माहिती, त्यांना लागणारा ऑक्सिजन व कालावधी तसेच नवीन दाखल प्रतीक्षा यादी रुग्णांची वास्तविक अवस्था ही सर्व माहिती जिल्हाधिकारी यांनी गठित केलेल्या समितीला पाठवून निर्णय प्रक्रिया राबविण्यात येते. नाशिकच्या ऑक्सिजन टमधून सध्या रिफिलिंग ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यात येतो.ऑक्सिजन तुटवडा होऊ नये म्हणून शासकीय कोविड सेंटरला प्राधान्य देण्यात येते.वणी कोविड सेंटरमधे बेड वाढविण्यासाठी ऑक्सिजन पुरवठा अव्याहत सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. विधान सभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी औद्योगिक क्षेत्रातून ७५ ऑक्सिजन सिलिंडर प्रशासनाच्या माध्यमातून संकलित केले. मात्र सदरचे ऑक्सिजन सिलिंडर औद्योगिक वापराचे असल्याने त्या ऑक्सिजन क्लिनिंग प्रक्रिया पार पाडली.
ऑक्सिजन भरण्यापूर्वी अनुषंगिक तांत्रिक प्रक्रिया करावी लागणार आहे. वणी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र बागुल, समीर पाटील, तुषार पाटील, समीर देशमुख, प्रकाश देशमुख, अश्विनी जाधव, प्रियांका भुजबळ, गौरी निरहाली आदी परिश्रम घेत आहे.