दिंडोरी तालुक्यात आतापर्यंत ६८५५ लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तर त्यातील ६१५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत, तर आज तालुक्यात विविध ठिकाणचे खाजगी व सरकारी दवाखाने, कोविड सेंटर तसेच तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये उभारण्यात आलेले विलगीकरण कक्ष, घरांमध्ये ५०६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत दिंडोरी तालुक्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाने १०१ रुग्णांचा बळी घेतला आहे.
तालुक्याच्या ग्रामीण भागात आजही कोरोना विषाणूचा संसर्ग थांबलेला नाही. कोरोनाची सौम्य लक्षणे असणारे तपासणी न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने घराच्या घरी उपचार घेताना दिसत आहेत. तालुक्यात घरात उपचार घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. दिंडोरीपासून नाशिक शहराचे अंतर खूपच कमी आहे. अनेक लोकांचे नाशिक शहरात रोजचे जाणे-येणे आहे. तसेच शेतकऱ्यांचा मार्केटशी रोजचा संबंध येतो. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसून येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
कोट....
तालुक्यातील जनतेने अजूनही खूप काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तालुक्यात पाहिजे त्या प्रमाणात रुग्णसंख्या घटलेली नाही. कुणीही कामाशिवाय बाहेर पडू नये तसेच सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच भाजीपाल घेऊन जाणारे शेतकरी, किराणा दुकानदार यांनी मोठ्या प्रमाणात काळजी घ्यावी.
- डॉ. सुजित कोशिंरे, तालुका वैद्यकीय अधिकारी