नाशिक : काेरोनापाठोपाठ म्युकरमायकोसिसच्या संकटामुळे अनेक नागरिक त्रस्त झालेे आहेत. नागरिकांच्या उपचाराच्या सुलभतेसाठी आता
नाशिक जिल्ह्यात शासकीय व खासगी अशा एकूण आठ रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या सुविधेमुळे नागरिकांना आर्थिकदृष्ट्याही मोठा दिलासा मिळणार आहे.
नाशिक जिल्ह्यात पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोराेनामुक्त झालेल्यांना म्युकरमायकोसिसचा आजार होत असल्याचे आढळले आहे. ब्लॅक फंगस नावाने परिचित असलेल्या या आजारामुळे अनेक नागरिकांना त्रास तर होत आहेत; परंतु औषधोपचार आणि शस्त्रक्रियेचा खर्च काही लाखात आहे. त्यामुळे नागरिक आर्थिक विवंचनेत आहे. सध्या जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे २५९ रुग्ण आहेत. शासनाने अशाप्रकारचे आजार असलेल्यांवर रास्त दरात उपचार व्हावेत यासाठी पुढाकार घेतला आहे. शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांचादेखील समावेश असला तरी सर्वच रुग्णालयात म्युकरमायकोसिस उपचारासाठी सोय नाही तसेच त्यामुळे शासनाच्या योजनेंतर्गत आता जिल्ह्यातील या आजारावर उपचार करू शकणाऱ्या रुग्णालयांची यादी शासनामार्फत जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली. या यादीनुसार आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, पेठरोडवरील नामको कॅन्सर हॉस्पिटल, वडाळा रोडवरील सह्याद्री हॉस्पिटल, महात्मानगर येथील सिक्स सिग्मा मेडिकेअर हॉस्पिटल, वोक्हार्ट हॉस्पिटल, इगतपुरी तालुक्यातील एसएमबीटी संस्थेचे रुग्णालय तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय आणि मालेगाव येथील शासकीय रुग्णालय येथे उपचाराची सोय असेल असे आयुक्त जाधव यांनी सांगितले.