नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीचे गठन सुरू केले आहे. मात्र, न्यायालयाने या समितीच्या सदस्यत्वासाठी ठरवून दिलेली पात्रता म्हणजे बीएस्सी पदवी असलेले अवघे दोनच नगरसेवक असून, त्यामुळे समितीत नगरसेवकांच्या सहभागाविषयी शंका निर्माण झाली आहे. महापालिकेच्या आवाहनानुसार वनीकरणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अवघ्या दोन संस्थांचे पात्र सदस्य मिळाले असून, त्यामुळे आता निकषानुसार पाच सदस्यांचीच समिती गठित होण्याची शक्यता आहे. महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती अनेकार्थाने वादग्रस्तच आहे. गेल्यावर्षी महापालिकेने समितीचे सदस्य नियुक्त केले; मात्र त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. न्यायालयाने गेल्या एप्रिल महिन्यात यापूर्वी नियुक्त केलेले सर्व उमेदवार अपात्र ठरविले होते आणि नव्याने निुयक्ती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून ही समिती गठित करण्याची चर्चा होती. नगरसचिवांनी यासंदर्भात महापौरांना पत्रही दिले होते. आता त्यावर निर्णय होऊन शुक्रवारी (दि. २६) विशेष महासभा बोलविण्यात आली आहे. त्यात सदस्य नियुक्त होणार आहेत. सदस्य नियुक्तीसंदर्भात महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी (दि. २५) सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावली आहे. उच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यात वृक्ष प्राधिकरण समितीची फेररचना करण्याचे आदेश देताना त्या पात्रता शासन नियमानुसार विहित केल्या आहेत, त्यानुसार फक्त बीएस्सी पदवीधारक नगरसेवकांनाच समितीत सदस्य म्हणून काम करता येणार आहे. त्याचा विचार केला तर महापालिकेत सध्या दोनच नगरसेवक असल्याचे समजते. त्यामुळे आता १५ जणांच्या सदस्यत्वाठी नगरसेवकांची संधी हुकणार अशी चर्चा आहे. गुरुवारी (दि. २४) महापौर रंजना भानसी यांनी बोलविलेल्या बैठकीत मंथन होण्याची शक्यता आहे.शिक्षण समितीचे सदस्यही नियुक्त होणारमहापालिकेतील बहुचर्चित शिक्षण समिती सदस्यांची नियुक्तीदेखील शुक्रवारी विशेष महासभेत होणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे. महापालिकेने शिक्षण समितीऐवजी शिक्षण मंडळाचे गठन करण्यासाठी प्रयत्न केले; परंतु शासनाने प्रस्ताव फेटाळल्याने समिती नियुक्त करण्यात येणार आहे. समितीवरदेखील पंधरा सदस्य नियुक्त केले जाणार असून, त्यासाठीदेखील उमेदवार ठरविण्याची प्र्रक्रिया गुरुवारीच होणार असल्याचे वृत्त आहे....तर पाच जणांचीच समितीवृक्ष प्राधिकरण समितीत किमान पाच आणि जास्तीत जास्त १५ सदस्य नियुक्तकेले जाऊ शकतात. बीएस्सी शिक्षणाचा निकष ग्राह्य धरला तर दोन नगरसेवक नियुक्त होऊ शकतात, असे सांगितले जात आहे. उद्यान विभागाने अशासकीय सदस्य नियुक्तीसाठी केलेल्या आवाहनासाठी चार वेळा जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. तेव्हा कुठे तरी दोन संस्था नियमात पात्र ठरल्या आहेत. समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आयुक्त असतात, त्यामुळे चार सदस्य आणि अध्यक्ष अशा पाच जणांमध्ये समितीचे कामकाज चालू शकते, असे समितीच्या सूत्रांनी सांगितले.अशासकीय सदस्यही मिळेनामहापालिकेने वृक्ष प्राधिकरण समितीचे अशासकीय सदस्य नियुक्त करतानादेखील प्रशासनाला अनेक अडचणी आल्या. मध्यंतरी महापालिकेने एका वृक्षप्रेमी कार्यकर्त्याला बोलावून त्याला बळजबरीने एका उमेदवाराला आपल्या संस्थेमार्फत प्राधिकृत करण्याचा प्रयत्न केला; मात्र समितीवर गेल्यानंतर तो सदस्य काय करेल याची शाश्वती नसल्याने त्या वृक्षप्रेमीने आपल्या संस्थेचे शीर्षपत्र देण्यास नकार दिला.
वृक्ष प्राधिकरण समिती अडचणीत? : बीएस्सी पदवी असलेले अवघे दोनच नगरसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 1:46 AM