सिडको : जुने सिडकोतील सावरकर चौकात शनिवारी दुपारी अचानक लिबांचे झाड उभ्या असलेल्या रिक्षावर कोसळले. रिक्षाचालक कांद्याची गोणी देण्यासाठी उतरलेला असल्याने जीवितहानी झाली नाही, अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी झाड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.जुने सिडकोतील सावरकर चौकात रस्त्यालगत लिबांचे झाड असून, सदर झाड वाळल्याने ते कधी ही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे सदर झाड तोडावे यासाठी परिसरातील नागरिकांनी मनपा उद्यान विभागाकडे अर्ज दिला होता. परंतु या अर्जाकडे मनपा उद्यान विभागाने दुर्लक्ष केले. शनिवारी दुपारी अचानक लिंबाचे झाड उन्मळून रस्त्यावर कोसळले. सदर रस्ता मुख्य असल्याने वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. झाड कोसळले त्यावेळी भूषण पवार या रिक्षाचालकाने रिक्षा (क्रमांक एमएच १५, एफयू १०९८) मध्ये आणलेली काद्यांची गोणी उचलून भावाच्या घरी घेऊन गेला. त्याचवेळी झाड रिक्षावर कोसळले. यात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर दैव बलवत्तर म्हणून पवार यांना इजा झाली नाही व रस्त्यावर कोणी ही वाहनचालक अथवा पादचारी जखमी झाले नाही. परंतु झाड रस्त्यावर पडल्याने महाराणा प्रताप चौककडून शिवाजी चौककडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली. अग्निशामक दलाच्या कामगारांनी झाड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
सिडकोत झाड कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 9:20 PM