नाशिक- शहरातील गंगापूररोडवर होरायझन स्कूल जवळ रस्त्याच्या मधोमध असलेल्या उंबराच्या झाडावर मोटार आदळल्याने अभिजीत संजय शिंदे (वय ३०) या युवकाचा बळी गेला. याघटनेनंतर परीसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून रस्त्यातील धोकादायक झाडे केव्हा हटविणार असा प्रश्न केला जात आहे.
अभिजीत शिंदे हा युवक बुधवारी (दि.२९) लग्न सोहळ्यावरून स्विफ्ट कारने घरी येत होता. होरायझन स्कूलजवळच सहदेव नगर येथील तो रहीवासी होता. घराचे अंतर काही मीटर अंतरावर असतानाच त्याची मोटार रस्त्याच्या मध्ये असलेल्या उंबराच्या झाडावर आदळली. रस्त्याच्या मध्ये अशाप्रकारचे झाड असल्याने ते त्याच्या लक्षातच आले नाही. त्यामुळे त्याची मोटार झाडावर आदळली आणि जो जागीच ठार झाला. यामुळे परीसरात शोककळा पसरली आहे. बुधवारी (दि.२९) सकाळी त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
नाशिक शहरात गेल्या चार ते पाच वर्षांपासून वृक्ष तोडीचा विषय गाजत आहे. रस्ता रूंदीकरणात येणारी झाडे तोडण्यास वृक्षप्रेमींचा विरोध असल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने वड, पिंपळ आणि उंबरासारखी देशी प्रजातीची झाडे तोडण्यास नकार दिला असून त्यामुळे अन्य अनेक झाडे तोडली तरी रस्त्याच्या मध्येच असलेली ही झाडे तोडण्याबाबत मात्र महापालिकेचे हात कायद्याने बांधले गेले आहेत. शिंदे याच्या अपघातानंतर परीसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आणि अपघाताला कारणीभूत ठरणारी झाडे तोडण्याची मागणी करण्यात आली आहे.