नाशिक : महापालिकेच्या वतीने हैदराबादच्या धर्तीवर ‘ट्री पार्क’ तयार करण्यात येणार असून, त्यासाठी पंचवटीतील म्हसोबावाडी येथे पन्नास एकरात हे पार्क साकारण्याची तयारी सुरू आहे.महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी उद्याने साकारण्यात आली आहे. परंतु फाळके स्मारक वगळता अन्य उद्याने फार वैशिष्टपूर्ण नाहीत. त्यामुळे वेगळ्या थीमचे उद्याने साकारण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याअंतर्गत आयुक्तांनी हैदराबादच्या धर्तीवर ट्री पार्क साकारण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पंचवटीतील म्हसोबावाडी येथे पन्नास एकर जागेची निवड करण्यात आली आहे. वनौषधी आणि अन्य दुर्मिळ प्रजातींची रोपे येथे लावण्यात येणार आहे. नाशिकच्या हवामानाला अनुकूूल अशा झाडांची निवड करण्यात आली आहे. त्याच बरोबर महापालिकेने यंदा वृक्षरोपणाची तयारी केली असून, जून महिन्यात दहा हजार रोपे लावण्यात येणार आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागाकडून गेल्या अनेक वर्षांत पुरेशा प्रमाणात झाडे लावली जात नाही. गेल्यावर्षी महापालिकेने ठेकेदारामार्फत झाडे लावण्याची तयारी केली होती. तथापि, निमा या उद्योजकांच्या संघटनेने झाडे लावण्यासाठी तयारी दर्शविली होती. पालिकेच्याच जाचक अटींमुळे निमाचा उत्साह मावळला आणि पालिकेनेदेखील एकही झाड लावले नाही. त्यामुळे आता मात्र पालिकेने जोरदार तयारी सुरू केली असून, जून महिन्यात ही झाडे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्तआयुक्त अनिल चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)
हैदराबादच्या धर्तीवर नाशकात ट्री पार्क
By admin | Published: May 28, 2015 11:39 PM