उपनगर : शहरातील मुख्य रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या अनेक वृक्षांच्या पुनर्रोपणाची (री प्लान्टेशनची) प्रक्रिया आगरटाकळी परिसरातील मनपाच्या मोकळ्या भूखंडावर केली जात आहे. पुनर्रोपण यशस्वी झाल्यास अल्पावधीतच या ठिकाणी नंदनवन फुलू शकेल.शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या अनेक वृक्षांवरील संकट यामुळे टळणार आहे. ृवृक्षांना जीवनदान मिळणार असल्याने वृक्षप्रेमींकडून स्वागत केले जात आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या वृक्षांची तोड करण्याऐवजी त्यांचे पुनर्रोपण करावे, असा निकाल दिल्यामुळे विजय-ममता चौफुलीनजीकच्या श्री श्री रविशंकर मार्गावरील २४ नारळाच्या झाडांचे टाकळी येथील भूखंडावर पपया नर्सरीच्या माध्यमातून तंत्रशुद्ध पद्धतीने पुनर्रोपण करण्यात आले.टाकळीरोडवरील गीताईनगर वसाहतीसमोरच्या मनपाच्या पाच एकराच्या मोकळ्या भूखंडावर चारही बाजूने वृक्षांचे पुनर्रोपण करण्यासाठी ६ बाय ६ फुटाचे खड्डे खोदून त्यात विविध वृक्षांचे जेसीबीच्या साह्याने पुनर्रोपण केले जात आहे. आत्तापर्यंत या ठिकाणी ४० हून अधिक भव्य वृक्षांचे पुनर्रोपण केले जात आहे. वृक्षांचे पुनर्रोपण करताना नव्या मुळांना पोषक द्रवे मिळण्यासाठी रूट झोन, गांडूळ खत, कोकोपीट, निंबोळी पेंड आदि जैविक खतांचा वापर केला जात असून मुळांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी बीसीसी पावडर व रासायनिक औषधांचीदेखील फवारणी करण्यात येत आहे. आतापर्यंत याठिकाणी २२ नारळाची, गुलमोहर- ५, बदाम- १, रेन ट्री- १२ आदि वृक्षांचे पुनर्रोपण यशस्वीपणे पार पाडण्यात आल्याची माहिती पपया नर्सरीचे सुभाष जाधव यांनी दिली. दरम्यान, पुरातन वृक्षांचे पुनर्रोपण करण्यासाठी अभ्यास केला जात आहे. (वार्ताहर)
टाकळी परिसरातील रस्त्यावर वृक्षांचे पुनर्रोपण
By admin | Published: February 24, 2016 11:18 PM