नाशिक : ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक आणि हरित नाशिक’ करण्याचे स्वप्न नेहमीच नाशिककरांना दाखविले जाते. त्यातील ‘स्वच्छ आणि सुंदर नाशिक’ या संकल्पनेची प्रतीक्षा कायम असली तरी ‘हरित नाशिक’कडे मात्र शहराची वाटचाल सुरू आहे. महापालिकेमार्फत गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली वृक्षगणना अंतिम टप्प्यात असून, आतापावेतो ३८ लाख ४४ हजार वृक्षसंपदा आढळून आली आहे. शहराची सुमारे २० लाख लोकसंख्या लक्षात घेता प्रतिमाणशी दोन वृक्ष असे प्रमाण असून, नाशिककरांसाठी ही शुभवार्ता आहे.महापालिकेने खासगी एजन्सीमार्फत नोव्हेंबर २०१६ पासून शहरात वृक्षगणना सुरू केलेली आहे. वृक्षगणनेत ३ मीटरवरील वाढीचे वृक्ष मोजले जात आहेत. आतापर्यंत नवीन ३१ प्रभागांपैकी २२ प्रभागांमधील वृक्षगणना पूर्ण झाली असून, सद्यस्थितीत ९ प्रभागांमध्ये गणनेचे काम सुरू आहे. आतापावेतो शहरात ३८ लाख ४४ हजार ४३२ वृक्ष आढळून आले आहेत. त्यात २३८ प्रजाती आढळून आल्या आहेत. यामध्ये औषधी गुणधर्म असलेल्या २५ प्रजाती, फळझाडांच्या ६१ प्रजाती आढळून आल्या आहेत. सुमारे ७९ दुर्मीळ प्रजातीही सापडल्या आहेत. एकूण वृक्ष गणनेपैकी ५६ टक्के वृक्ष हे ११ ते २० वर्षे तर ४३ टक्के वृक्ष २१ ते ३० या वयोगटातील आढळून आले आहेत. सर्वात जास्त वृक्षसंख्या ही प्रभाग ३१ मध्ये १४ टक्के, प्रभाग १९ मध्ये १० टक्के, प्रभाग ६ मध्ये ९ टक्के, प्रभाग १ मध्ये ९ टक्के तर प्रभाग २७ मध्ये ८ टक्के इतकी निदर्शनास आलेली आहेत. ६७ टक्के वृक्ष हे सरकारी जागेत तर ३३ टक्के वृक्ष हे खासगी जागेत आढळले आहेत. महापालिकेने २००७ मध्ये केलेल्या वृक्षगणनेत त्यावेळी १८ लाख वृक्षसंपदा आढळून आली होती. मात्र, गेल्या दहा वर्षांत वृक्षांची संख्या दुपटीने वाढली असून, शहरात पर्यावरणविषयक वाढलेली जाणीव-जागृती हे त्याचे कारण आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून वृक्षलागवडीची चळवळही जोमात आहे. विविध संस्थांसह शाळा-महाविद्यालयांचा सहभाग त्यामुळे महत्त्वपूर्ण ठरत आलेला आहे. महापालिकेनेही गेल्या दीड वर्षांत दहा फुटांवरील सुमारे २१ हजार वृक्षांची लागवड केलेली आहे. शहराची लोकसंख्या सुमारे १८ ते १९ लाखांच्या आसपास मानली जाते. त्या तुलनेत शहरात ३८ लाख वृक्षसंपदा असल्याने प्रतिमाणशी दोन वृक्ष असे प्रमाण दिसून येते. प्रदूषणमुक्त शहराच्या संकल्पनेसाठी वृक्षांची ही संख्या नाशिककरांना दिलासादायक ठरणार आहे.आणखी संख्या वाढणारमहापालिकेच्या वृक्षगणनेचे काम ९९ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे. नाशिकरोड-देवळाली परिसरातील आर्टिलरी सेंटरचा लष्करी भाग, नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस व करन्सी नोट प्रेसचा परिसर, सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीतील परिसर याठिकाणी अद्याप वृक्षगणना झालेली नाही. सदर वृक्षगणना करण्यासाठी महापालिकेने संबंधित यंत्रणेकडे परवानगी मागितली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षसंपदा असून, त्यामुळे वृक्षांची संख्या आणखी वाढून ती ४० लाखांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
वृक्षगणना : ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक आणि हरित नाशिक’ शहराची ‘हरित नाशिक’कडे वाटचाल प्रतिमाणशी दोन वृक्ष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 12:37 AM
नाशिक : ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक आणि हरित नाशिक’ करण्याचे स्वप्न नेहमीच नाशिककरांना दाखविले जाते.
ठळक मुद्देनाशिककरांसाठी ही शुभवार्ता शहरात ३८ लाख ४४ हजार ४३२ वृक्ष