नांदगावच्या उड्डाणपुलापासून तर साकोरा गावापर्यंत रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाने चार महिन्यांपूर्वी आपल्या मर्जीतील एका ठेकेदाराकडून २५ ते ३० निव्वळ निंबाच्या झाडांची कत्तल केली होती. त्यावेळी संबंधित विभागाला रस्त्यावर आलेली अनेक चिंचाची झाडे का दिसली नाही असा संतप्त सवाल वाहनचालकांनी यावेळी व्यक्त केला. तसेच रस्ता रूंदीकरण करणाºया ठेकेदाराने सदर रस्ता रूंदीकरणाचे काम अपूर्ण ठेवले असल्याने या रस्त्यावर असलेल्या मोरखडी बंधारा पाण्याने भरला असून वाहनचालकांना पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.रविवारी सकाळी सहा वाजेच्या दरम्यान म्हसोबा मंदिरालगतच्या वळणावर अचानक मोठे चिंचेचे झाड रस्त्यावर आडवे पडल्याने वाहतूक ठप्प झाली.त्यामुळे दोन्ही बाजुला वाहनांची रांग लागली होती.सुदैवाने या झाडाखाली कोणीही वाहनचालक न सापडल्याने जीवीतहानी झाली नाही. त्यानंतर मात्र झाड बाजूला कोण करणार म्हणून वाहनचालकांना मोठा प्रश्न पडला होता. मात्र संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून जयराम आहेर यांनी माहिती देऊन प्रीतम पाटील यांच्या जेसीबीच्या साहाय्याने रस्ता मोकळा करण्याचे ठरले होते. याच झाडाच्या मध्यभागात मधमाशांचे मोहोळ असल्याने चालकाने घाबरून सुरूवातीला झाड बाजूला करण्यास नकार दिला. मात्र नंतर जेसीबीच्या काचा बंद करून अथक प्रयत्नानंतर रस्ता मोकळा करून दिल्याने वाहनचालकांनी आभार मानले आहेत.
साकोरा-नांदगाव रस्त्यावर झाड कोसळले; वाहतूक ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2020 6:16 PM