सुदर्शन सारडा ओझरओझर गटाने यंदा सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. वीस वर्षांपासून ताब्यात असलेल्या ओझर गटात यंदा शिवसेनेला उमेदवार मिळाला नसल्याने यंदा गटावर भगवा फडकणार नाही. निवडणुकीमधून सेनेची एक्झीट हीच गोष्ट अचंबित करणारी ठरली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि नागरिक आघाडी यांनी कंबर कसल्याने आता सामना तिरंगी होणार हे स्पष्ट झाले आहे. ऐनवेळी शिवसेना नेमकी काय भूमिका घेते, याकडे सर्वपक्षीयांचे लक्ष लागून आहे.दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गटामध्ये मर्चंट बँकेचे संचालक माजी सरपंच राजेंद्र शिंदे, तर काँग्रेसकडून ओझर गणामध्ये किरण दोंदे आणि टाउनशिप गणात माजी सरपंच हेमंत जाधव हे रिंगणात आहेत, तर ग्रामपंचायतीमध्ये सत्ता असलेल्या नागरिक आघाडीकडून ग्रामपंचायत सदस्य यतीन कदम हे रिंगणात आहेत. तसेच ओझर गणात नितीन पवार व टाउनशिप गणात नितीन जाधव हे रिंगणात आहेत.गटात भाजपाकडून शिक्षक असलेले रमेश त्र्यंबक कदम, तर गणात दीपक श्रीखंडे व टाउनशिप गणात राजेंद्र दोंदे रिंगणात आहेत. ओझर गणात अपक्ष म्हणून योगेंद्र दांडेकर, तर बसपाकडून प्रकाश चौधरी हे उमेदवारी करीत आहेत. ओझर-टाउनशिप गणात बसपाकडून ग्रामपंचायत सदस्य असलेले धर्मेंद्र जाधव आहेत तर मनोज पांडव अपक्ष आहेत. गट ओबीसी आरक्षित झाल्याने सुरुवातीपासून इच्छुकांनी जमेल त्या मार्गाने मतदारांना आकर्षित केले असले तरी कोण किती मते घेतो यावर विजयाचे गणित असेल. ओझर गटामध्ये राजेंद्र शिंदे यांनी सरपंचपद उपभोगले असून, गावातील व उपनगरातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण व अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा पाइपलाइनचे तसेच इतर कामे केली आहेत. यतीन कदम यांनी गावातील अतिक्रमणे तसेच एचएएलकडून भेटलेल्या निधीतून गावातील मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करून डांबरीकरण केले, यासह इतर कामे ही त्यांनी केली आहेत. रमेश कदम यांच्याकडेदेखील ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा अनुभव आहे.
ओझरला रंगणार तिरंगी सामना
By admin | Published: February 16, 2017 12:16 AM