निफाड : सात वर्षांपासून निफाड सहकारी साखर कारखान्याची जिल्हा बॅँकेकडून दोन ते तीन वेळा टळलेली जप्तीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. निसाकाकडे कर्ज व व्याजासह असलेल्या १३३ कोटी २५ लाख २७ हजार रुपयांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी गुरुवारी (दि. ४) जप्तीची कारवाई जिल्हा बॅँकेकडून करण्यात येणार आहे. निफाड सहकारी साखर कारखान्याने जिल्हा मध्यवर्ती बॅँकेकडून वेळोवेली घेतलेल्या कर्जाची व्याजासह रक्कम १३३ कोटी २५ लाख २७ हजार इतकी होऊनही तीन वर्षात या थकीत कर्जाची परतफेड करताना कुठलीही वसुली न झाल्याने जिल्हा बँकेच्या एनपीए वाढ झाली आहे. त्याचा परिणाम बॅँकेचा आर्थिकस्तर खालावण्यावर झाला होता. त्यामुळे जिल्हा बॅँक प्रशासनाने निसाकाच्या मालमत्ता जप्तीचा निर्णय घेतला. बॅँकेने सिक्युअर्ड क्रेडिटर या नात्याने निसाकाची स्थावर व जंगम मालमत्ता सिक्यूरिशन अॅन्ड रिकोन्सट्रेशन आॅफ फायनाशिअस अॅक्ट इन्फोसमेंट आॅफ सिक्युरिटी इनट्रेस्ट अॅक्ट २००२ या कायद्याच्या कलम १३ (४) नुसार गुरुवारी (दि. ४) जप्त करून ताब्यात घेण्यात येणार आहे. त्याबाबतची नोटीस जिल्हा बॅँक प्रशासनाच्या वतीने प्राधिकृत अधिकारी शिरसाठ यांनी निसाकाला दिली आहे. जप्ती कारवाईप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा बॅँकेने निफाड पोलिस ठाण्याकडे पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या निसाकाने उत्कृष्ट कार्य करीत सुवर्णपदकाचा मानकरी ठरले होते. निसाकामुळे य् निफाड तालुक्याच्या विकासात भर पडत होती. त्याच गौरवशाली निसाकाच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई होणे दुदैवाची बाब असल्याची तालुक्यात चर्चा आहे. वसाका सुरू करण्यासाठी तिथले राजकीय नेते हवेदावे विसरून एकत्रितपणे प्रयत्न करतात. मात्र बागायतदार म्हणवणारे तालुक्यातील राजकीय नेते निसाकाला वाचविण्यासाठी कुडलींी धडपड करताना दिसून येत नाही. निसाकाचे कामगार व शेतकरी सभासदाच्या दृष्टीने कुठलाही विचार गांभीर्याने कुणी नेते करीत नसल्याची खंत उस उत्पादक व कामगाराकडून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
निसाकाच्या मालमत्तेवर उद्या जप्तीची कारवाई
By admin | Published: February 02, 2016 11:19 PM