लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या शासकीय/ अनुदानित आश्रमशाळा व वसतिगृहाचे कामकाज ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश नाशिकचे प्रकल्प अधिकारी यांनी सोमवारी प्रसिद्धिपत्राद्वारे दिले आहेत.
आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत असलेल्या शासकीय, अनुदानित आश्रशाळा व वसतिगृहाचे कामकाज ५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत/ वसतिगृहात पुढील आदेश येईपर्यंत बोलावण्यात येऊ नये, असेही कळविण्यात आले होते. ही मुदत सोमवारी (दि. ५) संपुष्टात आली असली तरी अद्याप कोविड-१९ चे संकट कमी झालेले नाही. या आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्थेने स्थानिक पातळीवर शाळा बंदचे निर्देश दिले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी पालकांच्या ताब्यात सुरक्षित राहावे यासाठी ३० एप्रिलपर्यंत शालेय कामकाज बंद ठेवण्यासोबतच विद्यार्थ्यांना शाळेत/ वसतिगृहात पुढील आदेश येईपर्यंत बोलावण्यात येऊ नये, असे निर्देश एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत शालेय शिक्षण विभागाच्या सूचना प्राप्त होतील त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाने केल्या आहेत.