नाशिक : राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा दि. ४ फेब्रुवारीपासून नाशिकलाच मुक्काम ठोकणार असून, जिल्हा परिषदेच्या २९ गटांतील अनुसूचित जमाती संवर्गातील सर्वच्या सर्व २९ जिल्हा परिषद सदस्य निवडून आणा, असे आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विष्णू सावरा यांना दिल्याची चर्चा आहे. मंगळवारी (दि. २४) यासंदर्भात विष्णू सावरा यांच्या प्रमुख उपस्थितीत पिंपळगाव बसवंत येथे भाजपाच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक झाली. बैठकीस खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार, आमदार अपूर्व हिरे, संघटनमंत्रीकिशोर काळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समीर चव्हाण, बापू पाटील यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. दि. ४ ते १९ फेब्रुवारी दरम्यान पंधरवडाभर फिरून विष्णू सावरा भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी जिवाचे रान करणार आहेत. विशेषत: या २९ अनुसूचित जमाती संवर्गातील राखीव गटातून जास्तीत जास्त भाजपाचेच उमेदवार निवडून आणावेत, याची जबाबदारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्यावर सोपविल्याने सावरा याबाबत अधिक गंभीर आहेत. त्याच अनुषंगाने मंगळवारी त्यांनी पिंपळगाव बसवंत येथे बैठक घेऊन पुढील प्रचार व प्रसाराचे नियोजन केले. (प्रतिनिधी)
आदिवासी विकासमंत्र्यांचा नाशिकला ‘मुक्काम’
By admin | Published: January 25, 2017 12:19 AM