नाशिक : निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपले दैनंदिन जीवन व्यथित करणारा आदिवासी समाज आजही विस्थापनाच्या गराड्यात अडकलेला आहे. मागील अनेक वर्षांपासून हा समाज भरडला जात असून, या समाजाचे विस्थापन थांबणे काळाची गरज आहे, असा सूर ‘आदिरंग’मध्ये उमटलादिल्ली येथील राष्ट्रीय नाट्य विद्यालय व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भाभानगरच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात तीन दिवसीय आदिरंग महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने भारतातील विविध राज्यांमध्ये लोककलेचे संवर्धन करत निसर्ग रक्षणावर भर देणाऱ्या आदिवासी समाजाच्या व्यथा, समस्यांवर रविवारी (दि. ३१) परिसंवादात मंथन झाले. आदिवासी समाजाच्या अधोगतीची सुरुवात ४०० वर्षांपूर्वी झाली हे वास्तव लपवूनही हा आदिवासी समाज तितक्याच स्वाभिमानाने जीवन जगत समाजाचे मनोरंजन करत आहे. आदिवासी समाज आधुनिक मूल्यांकडे झुकत असला तरी त्याचे विस्थापन थांबलेले नाही, अशी खंत राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे उपाध्यक्ष अर्जुन चरण यांनी व्यक्त केले. आदिरंग महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ‘निसर्ग आणि आदिवासी संगीत, नृत्य आणि नाट्य यांचा आंतरसंबंध’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाअंतर्गत सोनल कुलकर्णी यांनी आदिवासी जीवनातून समानता, सरळता आणि स्वाभाविकता झळकत असल्याचे सांगितले. आदिवासी समाजातील जीवन जगण्याची कला त्यांना ऊर्जा देत असल्याचेही कुलकर्णी म्हणाल्या. प्रा. गोविंद शर्मा, एस. ए. कृष्णय्या, प्रा. एन. भकत वत्सल रेडडी यांनी देशााच्या विविध राज्यांमध्ये उपेक्षित जीवन जगणाराया आदिवासींच्या समस्यांवर प्रकाशझोत टाकला. आदिवासींचे पुनर्वसन, आरोग्य, शिक्षण, रोजगार आदि बाबींवर मंथन झाले. (प्रतिनिधी)
‘आदिवासींचे विस्थापन थांबणे गरजेचे’
By admin | Published: August 01, 2016 12:50 AM