दोन वर्षांपूर्वी बिऱ्हाड आंदोलनादरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी २०१९साली ठाकूर यांच्याविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात ठाकूर हे पोलिसांना हवे होते. त्यांचा पोलीस वारंवार शोध घेत होते; मात्र ते राहत्या घरासह कोठेही आढळून येत नव्हते. दरम्यान, ठाकूर यांनी पुन्हा आदिवासी कार्यालयापुढे बुधवारी (दि.१०) आंदोलन केले असता पोलिसांनी शिताफीने त्यांना रात्री अटक केली. ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांपूर्वी आदिवासी विकास भवनावर रोजंदारी कर्मचाऱ्यांनी ‘बिऱ्हाड’ मोर्चा काढला होता. या मोर्चादरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली होती. यामुळे त्यांच्यावर त्याचवेळी मुंबईनाका पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अधिक उपनिरीक्षक तपास चेतन श्रीवंत हे करीत आहेत.
दरम्यान, शासकीय सेवेत कायम नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी संशयित रितेश ठाकूर व त्यांच्या अन्य काही साथीदारांविरुध्द तक्रार अर्ज ग्रामीण पोलिसांना प्राप्त झाला आहे. या तक्रार अर्जाची चौकशी अपर पोलीस अधीक्षक यांच्याकडून सुरू असून यामध्ये तथ्य आढळल्यास संशयितांविरुध्द योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितलेे.
महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन, चार कर्मचारी संघर्ष संघटनेचा अध्यक्ष म्हणून रितेश ठाकूर ग्रामीण भागात फिरत होता. या संघटनेत रोजंदारीवर काम करणाऱ्या वर्ग ३ व ४ च्या आदिवासी सभासदांना कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. आदिवासी विकास विभागात पेसा अंतर्गत विशेष शिक्षक भरती प्रक्रिया २०१८-२०१९ सुरु होती. त्यात कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून रितेश याच्यासह इतर संशयितांनी संघटनेच्या सभासदांकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांपर्यंत पैसे घेतले. याप्रकारे ४४ लाख ६० हजार रुपये जमा झाल्यानंतर संशयित फरार झाले. त्यांनी सभासदांना नोकरी दिली नाही किंवा पैसेही परत केले नाही. यामुळे फसवणूक झालेले कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. अखेर सुरगाणा येथे संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.