घोटी : इगतपुरी तालुक्यातील मोगरे येथे जादूटोणा (चेटूक) केल्याच्या संशयावरून नात्यातीलच व्यक्तींनी एका आदिवासी कुटुंबाला तब्बल बारा तासांहून अधिक काळ कोंडून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला असून, त्यातून कशीबशी सुटका करून बाहेर आलेल्या कुटुंबप्रमुखाने घोटी पोलीस स्टेशन गाठून झालेला प्रकार कथन करूनही पोलिसांनी दखल घेतली नाही.शुक्रवारी (दि. १९) रात्री ११ वाजेच्या सुमारास रामदास काळू जाखेरे हे आपल्या कुटुंबासह झोपले असताना गावातीलच विजय धोंडीराम जाखेरे, सुखदेव बहिरू जाखेरे, अजय सुखदेव जाखेरे, बंडू बहिरू जाखेरे, ताराबाई बंडू जाखेरे व गणपत बहिरू जाखेरे आदि संशयितानी रामदास जाखेरे यांच्या घरी येत ‘तू भुतळा आहेस आणि तू चेटूक केले म्हणून आमची इतकी माणसे मेली’, अशी कुरापत काढून संपूर्ण कुटुंबाला जिवे ठार मारण्याची धमकी देत घरातच डांबून ठेवले. या सर्व संशयितांनी सोबत हत्यारे आणल्याने हे कुटुंब भयभीत झाले होते. अशातच पहाटे ४ वाजेच्या सुमारास रामदास याने घराच्या माडीवर जाऊन छपराची कौले काढून सुटका करून घेतली व थेट पायी चालत घोटी पोलीस स्टेशन गाठले. घडलेला सर्व प्रकार घोटी पोलिसांसमोर कथन केला. मात्र पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल न घेता त्यास रात्रभर पोलीस ठाण्याच्या आवारातच बसवून ठेवले.(वार्ताहर)
आदिवासी कुटुंबाला कोंडले
By admin | Published: February 20, 2016 9:20 PM