नांदूरशिंगोटे येथील आदिवासी महिला ग्रामपंचायत सदस्य सगुना वाळिबा मेंगाळ यांनी सोमवार (दि.२) रोजी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा ग्रामविकास अधिकारी एस.डी. अहिरे यांच्याकडे दिला होता. मात्र, अवघ्या दहा दिवसांतच राजीनामा पडताळणीअगोदर मेंगाळ यांनी प्रसिद्धीपत्रक देत आपला राजीनामा माघारी घेत सर्वांचे लक्ष केंद्रित केले आहे. येथील ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवारी (दि.१३) विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सरपंच गोपाल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली मासिक बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अजेंड्यावर मेंगाळ यांच्या राजीनामा पडताळणीचा विषय होता. बैठकीस मेंगाळ या आपल्या पती वाळिबा मेंगाळ यांच्यासह हजर होत्या. गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एकलव्यनगर व बोगदेवाडी या दोन्ही आदिवासी वस्त्यांवर शौचालय अनुदान, वीज, पाणीपुरवठा, घरकुल, रस्ते आदी विकासकामे राबविण्यात आली आहेत, तसेच ग्रामपंचायत सभागृहात नेहमीच आदिवासी बांधवांना सन्मानपूर्वक वागणूक दिलेली असून, विविध योजनांचा लाभ आदिवासी घटकांना मिळाला असल्याचे मेंगाळ यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
यावेळी बैठकीस सरपंच गोपाल शेळके, उपसरपंच दीपाली पठारे, ग्रामपंचायत सदस्य उत्तम बर्के, शरद शेळके, अनिल शेळके, निवृत्ती शेळके, शशिकांत येरेकर, रामदास सानप, तुळशीराम गिऱ्हे, विद्या भाबड, रंजना शेळके, अनिता शेळके, ग्रामविकास अधिकारी एस.डी. अहिरे आदींची उपस्थिती होती.
कोट...
गैरसमजुतीने राजीनामा
गावातील काही राजकीय व्यक्तींनी माझे पती व मला सरपंच तसेच ग्रामपंचायत प्रशासन यांच्याविरुद्ध गैरसमज निर्माण करून दिला होता. माझ्यावर दबाव आणून राजीनामा देण्यास भाग पाडले होते. मात्र, प्रत्यक्षात वस्तुस्थिती समोर आल्यानंतर माझी शहानिशा झाली आहे. त्यामुळे माझा गैरसमज दूर झाला आहे. कुठल्याही दबावास बळी न पडता माझा सदस्यपदाचा राजीनामा स्वखुशीने मागे घेत आहे.
-सगुना मेंगाळ, ग्रामपंचायत सदस्य
कोट ...
सर्वच घटकांना न्याय
स्वच्छ भारत अभियान प्रकरणाबाबत यापूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. शासनाच्या विविध योजना राबविताना गावातील सर्वच समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे. मात्र, गावात विविध प्रकारची विकासकामे सुरू असल्याने काही लोक राजकारण करीत आहेत. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण केले पाहिजे व चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत प्रशासनावर सुरू असलेली चिखलफेक थांबवावी.
-गोपाल शेळके, सरपंच, नांदूरशिंगोटे