येवला : शहरातील महात्मा फुले नगरमागील चुनाभट्टी परिसरातील रस्ता कामासाठी आदिवासी, वंचित नागरिकांनी येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
गेल्या शे-दीडशे वर्षांपासून दलित, आदिवासी, वंचित घटकातील नागरिकांची चुनाभट्टी परिसरात वस्ती आहे. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन साजरा होत असतानाही या वस्तीत अद्यापपावेतो सार्वजनिक वहिवाटीचा पक्का रस्ता झालेला नाही. सांडपाणी व पावसाळ्यात पावसाचं पाणी रस्त्यावर साचते. त्यामुळे चिखल व दलदल निर्माण होते. त्यामुळे या परिसरातील रहिवाशीवर्गाची येण्या-जाण्याची मोठी अडचण निर्माण होते.
वर्षानुवर्षाची मागणी असल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सन २०१९-२० या आर्थिक वर्षात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून रस्ता कामास मंजुरी व ८० लाख रुपये निधीस मंजुरी मिळविली होती. परंतु स्थानिक अधिकाऱ्यांनी सदर काम दुसर्या भागात वळविले. नगरपालिकेच्या जातीवादी धोरणाचा निषेध म्हणून स्वातंत्र्यदिनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर वंचित नागरिकांनी एकदिवसीय उपोषण केले.
प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चौकशी केली. मात्र, पालिका अधिकारी या आंदोलनाकडे फिरकले नाही. सदर आंदोलनात सत्यशोधक कम्युनिष्ट पक्षाचे भगवान चित्ते, रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कसबे, अदिवासी मूलनिवासीचे अजित पवार, धोंडीराम पडवळ, चंदू मंडलिक, सुजित पवार, पप्पू पवार, जीवन पवार, वाल्मीक गायकवाड, रणजित पवार, कैलास पाटोळे, भीमाबाई पवार, शिंदू पवार, अलका पवार, मीना पवार, तुळसा मोरे, मंदा शिंदे आदी सहभागी झाले होते.
(१७ येवला २)
170821\17nsk_31_17082021_13.jpg
येवल्यात रस्ताकामासाठी आदिवासींचे उपोषण.