लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कसमादेचे भूमिपुत्र माजी मंत्री कै. ए. टी. पवार यांच्या निधनाने आदिवासी समाज पोरका झाला असून, त्यांचे नेतृत्व हरपल्याची भावना जिल्हा परिषदेच्या सदस्य व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि.११) नवीन प्रशासकीय इमारतीत बोलविण्यात आली होती. या सभेत कै. ए. टी. पवार यांना श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यात आली. त्यांच्यामुळेच पुण्याला असलेले आदिवासी विकास विभागाचे कार्यालय नाशिकला आले. बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले की, त्यांच्या जाण्याचे जिल्ह्णाची मोठी हानी झाली असून, शिवसेना पक्षाच्या वतीने आपण त्यांना श्रद्धांजली वाहतो. हिरामण खोसकर यांनी श्रद्धांजली वाहताना ए. टी. पवार आदिवासींचे नेते होते. त्यांच्या जाण्याने पवार कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महेंद्रकुमार काले यांनी सांगितले की, नाशिकच्या भूमिपुत्राने राज्यात चांगल्या कामाने मोहोर उमटवली होती. रूपांजली माळेकर यांनी सांगितले की, तळागाळात इतके प्रभावी नेतृत्व उभे राहू शकते, हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिले. त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख उंचावत गेला. ते तापी प्रकल्पाचे प्रणेते होते. अशोक टोंगारे यांनी श्रद्धांजली वाहताना सांगितले की, पवार साहेबांच्या जाण्याने आमचा आदिवासी समाज पोरका झाला आहे. त्यांच्या रूपाने आदिवासींचा नेता हरपला आहे. अमृता पवार, सुरेखा दराडे, सिद्धार्थ वनारसे यांनीही शब्द सुमनांनी कै. ए. टी. पवार यांना श्रद्धांजली वाहिली. बांधकाम व अर्थ सभापती मनीषा पवार यांनी सांगितले की, आदिवासी समाज व बहुजन समाज त्यांचे कार्य विसरू शकत नाही. यापुढेही त्यांचे कार्य सुरूच राहील. सभापती सुनीता चारोस्कर व अर्पणा खोसकर यांनीही श्रद्धांजली वाहिली. अध्यक्ष शीतल सांगळे म्हणाल्या, ए. टी. पवार हे कसमादेचे भूषण होते. त्यांनी प्रत्येक संधीचे सोने केले.
एटींच्या रूपाने आदिवासींचा नेता हरपला
By admin | Published: May 12, 2017 1:33 AM