चांदवड - तालुक्यातील मतेवाडी येथे श्रमदानास गेलेल्या पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांवर स्थानिक आदिवासींनी केलेल्या हलल्यात सात जखमी असून त्यांच्यावर चांदवड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.तालुक्यातील मतेवाडी (शिवाजीनगर) जवळ असलेल्या डोंगराच्या पायथ्यांशी पाणी फांऊडेशनचे काम सुरु असतांना शुक्रवार दि. ३ मे रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास आदिवासींनी पाणी फांऊडेशनच्या कामास विरोध केला. गावकऱ्यांनी काम सुरु केले असता सकाळी ७ वाजता आदिवासी लोकांनी पाणी फांऊडेशनच्या कार्यकर्त्यांवर व कामगारांवर गलुर व गोफनच्या साह्याने हल्ला केला. हा वाद इतका विकोपाला गेला की, या आदिवासीनी पाणी फाऊंडेशनच्या कामगारांच्या ८ ते ९ गाड्या जाळल्या असून येथील जेसीबीची तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे. यात भाऊराव राघो चव्हाण, जिजाबाई भाऊराव चव्हाण,सुरेखा दगु मते, संतोष बबन मते, सागर शिवाजी कावळे आदि जखमी झाले आहेत. तर जेसीबी. आॅपरेटर मोटू प्रमाद व त्याचा सहकारी मुन्ना शहा हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयांत औषधोपचार सुरु आहेत. घटनास्थळी चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील , उपनिरीक्षक विशाल सनस, पोलीस कर्मचारी पोहचले त्यांनी परिस्थिती नियत्रंणासाठी नाशिक येथील दंगा नियंत्रण पथकाला पाचारण केले आहे.
चांदवड तालुक्यात पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांवर आदिवासींचा हल्ला, सात जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 1:25 PM