धनंजय रिसोडकर
नाशिक : महाराष्ट्रातील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या वतीने आदिवासींच्या उत्पादनांना बाजारपेठेतील ‘प्रीमियम ब्रॅन्ड’ म्हणून प्रस्थापित करण्याच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. राज्यातील आदिवासींनी निर्माण केलेली वैविध्यपूर्ण ‘शबरी नॅचरल्स’ उत्पादने येत्या महिनाभरात ‘ई कॉमर्स प्लॅटफॉर्म’द्वारे जगभरातून मागवता येऊ शकणार आहेत.
आदिवासी बांधवांच्या पारंपरिक उत्पादनांचा ‘शबरी ब्रॅण्ड’ विकसीत करत त्यांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यात शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यशस्वी ठरले आहे. त्या सर्व उत्पादनांना भारतात व विदेशात ऑनलाइन विक्री करण्यासाठी ‘ई-कॉमर्स’ही संकल्पना प्रथमच राबविण्यात आली असून, पोस्टाद्वारे भारतात, तसेच खासगी डिलिव्हरी पार्टनरसह जगभरात ही उत्पादने पोहोचविण्यात येणार आहेत.
कशाकशाला पसंती?
मोहाच्या फुलांपासून वाइन, साबण, मध, कुकीज, लाडू, मोगी भोग, महुआ मनुका, तेल, मॉइश्चरायझर, बांबूच्या हस्तकला अशी २१ उत्पादने आहेत. त्यात वाईन, मोहाचे सिरप, तेल, मधाला मागणी वाढली आहे.
बांबूच्या प्रकाशाच्या माळा, अस्सल चवदार तांदूळ, विविध फुलांपासून तयार झालेले मध, ज्वारी, नागलीपासून तयार केलेले लाडू असे सर्व प्रकार जगाला मिळतील.
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत देण्यात येत असलेल्या निधीमधून राज्यातील विविध आदिवासी शेतकरी प्रोड्यूसर कंपन्यांनी ही प्रीमियम उत्पादने बनविली आहेत. आदिवासी संस्कृतीचे दर्शन जगाला व्हावे, यासाठी शबरी नॅचरल्स या ब्रॅण्डखाली लवकरच ई-मार्केट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून देण्यात येतील.
लीना बनसोड, व्यवस्थापकीय संचालक