नाशिक : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून आदिवासींच्या विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. सध्या आदिवासी तरुणांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदरात कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांच्याशी साधलेला संवाद.
आदिवासी तरुणांना कोणत्या स्वरूपात कर्ज दिले जाते? पाच वर्षांपासून बंद असलेल्या योजनेचे केंद्र शासनाने पुनरुज्जीवन केले असून, या माध्यमातून अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी ४ ते ६ टक्के इतक्या अल्प दरात एक ते पाच लाखांपर्यंत कर्ज दिले जात आहे. या योजनेसाठी २५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, राज्यभरातून १,३०० लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. महिला सशक्तीकरण, स्वयंसहायता बचतगट आणि मुदत कर्ज अशा वेगवेगळ्या योजनांतर्गत कर्जपुरवठा करण्यात येणार आहे.
खावटीची रक्कम कधीपर्यंत मिळेल?खावटी योजनेचा लाभ देण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यासाठी खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात लाभार्थींना रोख रक्कम देण्यात येणार असून, त्यानंतर धान्य वाटप करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सुरू होण्यास किमान महिनाभराचा अवधी लागेल. राज्यात साडेअकरा लाख लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत.
कोरोनाच्या काळात महामंडळांकडून कोणती मदत करण्यात आली? आदिवासी विकास महामंडळामार्फत मागील वर्षी विक्रमी धान खरेदी करण्यात आली. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना ऐन लॉकडाऊनच्या काळात पैसा उपलब्ध झाला. खुल्या बाजारापेक्षा आमच्याकडे धानाला दुप्पट दर दिला जात असल्याने महामंडळाच्या खरेदी केंद्रांवर धान विक्रीस शेतकऱ्यांनी अधिक पसंती दिली. गतवर्षी ५० लाख टन धान खरेदी करण्यात आली.