सुरगाणा : कृषी विभागातर्फे आदिवासी शेतकऱ्यांना दिला जाणाºया यांत्रिकीकरणाच्या योजनेचा लाभ घेत तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी शेतकामात आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत प्रगतिपथाकडे वाटचाल सुरू केली आहे.कृषी विभागाकडून शेतीची औजारे व शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी अर्थसाहाय्य दिले जाते. याचाच लाभ तालुक्यातील पिंपळसोंड येथील भात उत्पादक शेतकरी शिवराम चौधरी यांनी भात लावणीसाठी घेत भाताच्या खाचरात ट्रॅक्टरच्या साहाय्याने चिखल करीत शेतकामात आधुनिकीकरण आणले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आधुनिक यंत्राच्या साह्याने भात लागवड करत असल्याचे चित्र तालुक्यात सध्या दिसून येत आहे.भाताच्या पुनर्लागवडीसाठी चिखलणीसाठी पारंपरिक बैलजोडी किंवा रेड्यांचा उपयोग केला जातो. दिवसभर भाताच्या खाचरात चिखल तुडवावा लागतो. यामध्ये वेळ आणि खर्च अधिक होतो. मात्र, सुरगाणा सजाचे कृषी सहायक एच. आर. गावीत, गुलाब भोये, तालुका कृषी अधिकारी अशोक ढमाले, मंडल अधिकारी जयराम आढल यांनी भात लागवड यंत्र, भात कापणी यंत्र, मळणी यंत्र, चिखलणी करण्यासाठी पॉवर टिलर म्हणजेच ट्रॅक्टरचा उपयोग चांगल्या पद्धतीने करता येतो तसेच वेळ व पैशांची कशी बचत होते याचे महत्त्व आदिवासी शेतकºयांना पटवून दिले.
कृषी विभागाकडून भात लावणीसाठी चिखल करायचे यंत्र घेण्यासाठी अनुदान मिळाले आहे. यंत्राच्या साह्याने भाताची लागवड केल्याने वेळेसह पैसाची बचत झाली. शासनाच्या योजनांच्या इतर शेतकºयांनीही लाभ घ्यावा.
-शिवराम चौधरी