सिन्नर : येथील पंचायत समितीच्या सभागृहात लोकप्रतिनिधी, अधिकारी, विविध शासकीय संघटनांचे पदाधिकारी यांनी शहीद जवान संदीप ठोक यांना शोकसभेद्वारे श्रद्धांजली अर्पण केली. १८ सप्टेंबर रोजी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मीर खोऱ्यातील उरी येथील भारतीय लष्करी तळावर हल्ला केला होता. त्यात सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथील संदीप सोमनाथ ठोक यांना वीरमरण आले होते. या शहीद जवानाचा मंगळवारी दशक्रिया विधी होता. येथील पंचायत समितीच्या सभागृहात मंगळवारी सायंकाळी सर्व खात्याच्या प्रमुखांसह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. या शोकसभेत शहीद जवान संदीप ठोक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भारतमातेच्या संरक्षणासाठी तालुक्यातील जवान शहीद झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा मनोदय प्रत्येक वक्त्याने आपल्या भाषणातून व्यक्त केला. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी आपल्या भाषणातून शहीद संदीप ठोक यांना शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र घुमरे, माजी सभापती बाळासाहेब वाघ, सदस्य रामदास खुळे, गटविकास अधिकारी मधुकर वाघ, उपअभियंता डी. एन. गडाख, वावीचे उपसरपंच विजय काटे, नवनाथ मुरडनर, बाजार समितीचे माजी सभापती कचरू डावखर, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघचौरे, संजय गिरी, तालुका वैद्यकीय अधिकारी मोहन बच्छाव, शिक्षक संघटनेचे विलास ढोबळे, सुकदेव आव्हाड यांच्यासह पंचायत समिती कर्मचारी, विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
शहीद जवान ठोक यांना सिन्नर येथे श्रद्धांजली
By admin | Published: September 30, 2016 1:06 AM