नाशिक : अयोध्येत राममंदिराची उभारणी व्हावी, यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून अशोक सिंघल यांनी आयुष्य वेचले. साधू-संतांना एकत्र केले. त्यामुळे राममंदिराची उभारणी हीच अशोक सिंघल यांना श्रद्धांजली ठरेल, असे मत संघ परिवारातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्तकेले. विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंंघल यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संघ परिवारातील विविध संघटनांच्या वतीने शंकराचार्य संकुल येथे शोकसभा संपन्न झाली. त्यावेळी हे मत व्यक्त करण्यात आले. विहिंपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष एकनाथ शेटे अध्यक्षस्थानी होते. तसेच आमदार सीमा हिरे, संघचालक बन्सीभाऊ जोशी, लक्ष्मीनारायण मंदिराचे आचार्य नरसिंहचार्य आणि दिगंबर आखाड्याचे प्रवक्ते भक्तिचरणदास, मविप्रचे सभापती अॅड. नितीन ठाकरे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.संघ परिवारातील ज्येष्ठ कुटूंब प्रमुखाच्या भूमिकेत असलेल्या सिंघल यांनी विश्व हिंदू परिषदेत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या असल्या तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी देशाचा एकात्मिक विचारच मांडला, असे मत यावेळी शेटे यांनी व्यक्तकेले, तर साधू समाज आणि विश्व हिंदू परिषद यांच्यात समन्वय साधण्याचे काम महंत नरसिंहचार्य आणि भक्तिचरणदास याांनी सांगितले. यावेळी अॅड. भानुदास शौचे, दिलीप महाजन, अनिल चांदवडकर, विजय मोहिते, आबासाहेब वडगणे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सिंघल यांच्या नाशिकमधील भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. रामभाऊ महाजन यांनी प्रास्ताविक केले, तर नाना गोविलकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
राममंदिराची उभारणी हीच सिंघल यांना श्रद्धांजली
By admin | Published: November 30, 2015 10:58 PM