त्र्यंबकेश्वर : शहरात आज दिवसभरात नऊ तासांत ८० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. मेनरोड, ग्रामीण रुग्णालय, अमृतकुंभ अतिथी निवास भागात पाणी साचले होते. यावर्षी तालुक्यात जूनऐवजी जुलैपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यातही काही दिवस पाऊसच पडला नाही, तर मागील वर्षी ५ सप्टेंबरपर्यंत १७६७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. तर यावर्षी फक्त १४७९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्याची पावसाची सरासरी २२०० ते २५०० मि.मी. पावेतो आहे. त्या मानाने यावर्षी अद्यापही पुरेसा पाऊस पडलेला नाही. तरीही पीक परिस्थिती उत्तम असून, खरिपाला ज्या ज्यावेळी पावसाची गरज असते त्या त्या वेळेस पावसाचे आगमन झालेले आहे. अर्थात मध्यंतरी काहीकाळ ओढ दिली होती. तथापि, दुबार पेरणीची गरज लागली नाही. तालुक्यात १०० टक्के पेरणी झाली असल्याचे कृषी अधिकारी अजय फलके यांनी सांगितले. दरम्यान, तालुक्यात एकूण खरीप हंगाम पेरणी क्षेत्र २६५०० हेक्टर असून, या वर्षाकरिता कृषी विभागाने ३८६७६.१२ हेक्टर क्षेत्र निर्धारित पेरणी क्षेत्र पेरणी अहवालात नमूद केले आहे. तालुक्यात भात, नागली, खरीप ज्वारी, मका व इतर तृणधान्य तसेच कडधान्यामध्ये तूर, मूग, उडीद व इतर कडधान्य, तर तेलबियांमध्ये भुईमूग, खुरसणी, सोयाबीन, सूर्यफुले व इतर तेलबियाधरून पूर्ण खरीप पेरणी १०० टक्के झाली आहे, तर दुसरीकडे ऐन गरजेच्या काळात युरिया खतच त्र्यंबकला उपलब्ध नाही. (वार्ताहर)दरम्यान, आज त्र्यंबकला ८० मि.मी. पावसात दोनवेळा गावात गोदावरीला पूर आला होता. तथापि, गावात नुकसानीलायक पूर परिस्थिती नव्हती. मात्र पूर्वाच्या उत्तरार्धात पावसाचा जोर वाढला आहे. (वार्ताहर)