नाशिक : महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत ‘त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ व अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका’ या पायलट स्मार्ट रोडचे काम सुरू आहे. अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या संपूर्ण मार्गाचे काम करावयाचे असल्याने ३१ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे़ या कामास रविवारी (दि़२५) सकाळी दहा वाजेपासून सुरुवात करण्यात आली असून, हे काम पूर्ण होईपर्यंत वा मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आल्याची अधिसूचना पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी काढली आहे़ रविवारपासून सीबीएस ते त्र्यंबक नाका हा मार्ग वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. तर त्र्यंबक नाका ते मेहर सिग्नल या मार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. दुपारपासून हा बदल करण्यात आल्याने मुख्य चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी झाली होती़ त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ या मार्गावरील स्मार्ट रोडचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावर एकेरी वाहतूक असणार आहे़ त्यामुळे महापालिका व कंत्राटदार यांनी या मार्गावर आवश्यक त्या उपाययोजना केल्या असून, वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़वाहनधारकांसाठी पर्यायी मार्गस्मार्ट सिटी योजनेअंतर्गत स्मार्ट रोडवर पायलट प्रोजेक्ट म्हणून अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या मार्गाचे नूतनीकरण होणार असल्याने पंचवटीकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सीबीएसकडे जायचे असल्यास त्यांनी रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-शालिमार-शिवाजीरोड-सीबीएस असे मार्गस्थ व्हावे.त्र्यंबक नाका-सातपूरकडे जावयाचे असल्यास शालिमार-खडकाळी सिग्नल-जिल्हा परिषदमार्गे त्र्यंबक नाका मार्गस्थ होतील़
त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ ‘वन-वे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 1:04 AM