नाशिक : सकाळी दहाला कार्यालयात हजर राहणे व रात्री थेट आठ ते नऊ वाजता घर गाठणे या दैनंदिन दहा तासापेक्षा अधिक तास काम करावे लागणाऱ्या त्र्यंबक तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा संयमाचा बांध सुटू लागला असून, सततच्या कामाच्या ताणामुळे प्रकृतीवर परिणाम होत असल्याचे पाहून त्यांनी सामूहिक रजेवर जाण्याचा पवित्रा घेतला असल्याचे वृत्त आहे. गेल्या सात ते आठ महिन्यांपासून दररोज कार्यालयातून घरी जाण्यास विलंब होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे कुटुंबीयही वैतागले आहेत. त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयात तलाठी, कारकून असे मिळून सुमारे पंचवीस कर्मचारी असून, या कर्मचाऱ्यांनी दररोज शासकीय वेळेत कार्यालयात हजर राहण्याचा दंडक घालून देण्यात आल्याने कार्यालयाची वेळ न चुकता पाळण्याकडे सर्वांचा ओढा आहे. परंतु त्यानंतर रात्री मात्र सात ते नऊ या दरम्यानच त्यांची सुटका केली जात आहे. तहसीलदारांकडून सायंकाळीच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अथवा बैठकीचे आयोजन केले जात असल्याने त्यांनी कार्यालय सोडल्याशिवाय कर्मचाऱ्यांनाही बाहेर पडणे अवघड होऊन बसले आहे. यामागे सिंहस्थ कामांचे निमित्त पुढे केले जाते. परंतु सिंहस्थ कामांचा व तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांचा काही एक संंबंध नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. नेहमीच विलंबाने होणाऱ्या सुटीमुळे वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजेवर जाण्यााचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली कैफियत मांडली जाणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
त्र्यंबकचे महसूल कर्मचारी सामूहिक रजेच्या तयारीत
By admin | Published: February 20, 2015 1:15 AM