त्र्यंबकेश्वर : श्रमजीवी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. १६) झोपडपट्ट्या, छोटे व्यावसायिक व पालिकेतील कंत्राटी कामगार आदिंनी त्र्यंबक नगरपालिकेवर मोर्चाच्या माध्यमातून धडक दिली. त्र्यंबक पालिकेतील मुख्याधिकारी शासकीय बैठकीसाठी नाशिकरोड येथे गेल्या होत्या. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याधिकारी जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत मोर्चेकऱ्यांनी कार्यालयातच ठिय्या मांडला होता.त्र्यंबकेश्वर शहरात अनेक वर्षांपासून आधिकारी, कष्टकरी यांच्यासह इतर लोक राहतात. त्यांची १९९० पासून घरे आहेत, अशी घरे जागेसह त्यांच्या नावावर यावीत, असा सरकारचा निर्णय झाला असताना पालिकेने अद्यापपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. आज १४ वर्षे होऊन गेली आहेत. उलट कुंभमेळ्याच्या नावाखाली भरपावसात त्यांची घरे पाडून टाकली. यापूर्वीदेखील मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन व्यथा मांडल्या होत्या. मात्र मुख्याधिकारी यांनी ठोस कार्यवाही केलेली नाही. या मागणीची दखल घ्यावी व तातडीने उपाययोजना कराव्यात. सन १९९५ पूर्वीच्या व सन २००२ झोपड्यांना संरक्षण द्यावे, रिक्षा पार्किंगसाठी प्रत्येक चौकात परवानगी द्यावी यामध्ये शिवाजी महाराज चौक, गगनगिरी चौक, कुशावर्त चौक, लक्ष्मीनारायण चौक, निवृत्तिनाथ महाराज चौक आदिंचा समावेश आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बंद केलेल्या टपऱ्या पुन:श्च चालू कराव्यात अशा विविध मागण्यांचा समावेश आहे. यावेळी उपनगराध्यक्ष अभिजित काण्णव, दिपक लढ्ढा पोलिस उपअधिक्षक श्यामराव वळवी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विवेक पंडित, विजय जाधव, भगवान मधे, तुकाराम लचके, लखन लिलके, रामराव लोंढे, अशोक लहांगे, श्रीमती लहांगे, बाळू झोले, मोहन सोनवणे आदिंसह बैठक होऊन संघटनेतर्फे सहा मागण्यांचा परामर्श घेण्यात आला. (वार्ताहर)
श्रमजीवी संघटनेतर्फे त्र्यंबकला मोर्चा
By admin | Published: January 17, 2017 1:19 AM