त्र्यंबकेश्वर : शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहीम शनिवारी चौथ्या दिवशीही सुरू राहिल्याने त्याच्या मोहिमेच्या निषेधार्थ शहरातील तरुणाई रस्त्यावर उतरली असून, बेमुदत बंदची हाक दिली. हजारो तरुणांच्या जमावाने मोहिमेच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. काही जणांनी सुरू असलेली सिंहस्थ कामे बंद पाडली. तथापि, मोर्चातील लोकांनी आम्ही कोणतेही काम बंद पाडले नसल्याचे सांगितले.त्र्यंबकेश्वरकरांनी गावात राबविण्यात येत असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचा विरोध म्हणून गावात उत्स्फूर्तपणे मोर्चाही काढला. पालिकेवर मोर्चा नेऊन पालिका व प्रशासनाविरुद्ध घोषणा दिल्या. कोणत्याही क्षणी काय होईल, अशा पद्धतीने वातावरणात तणाव निर्माण झाले होते. लोकांचा असंतोष उसळून आला होता. भर उन्हात मोर्चा काढून जव्हार फाट्यावर नेण्यात येऊन नंतर नगरपालिकेवर येऊन धडकला. गावात जिकडे पहावे तिकडे भकास दिसत होते. त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरील आक्षेपार्ह वाटणारी अतिक्रमणे पालिकेने पाडली तर देवस्थानच्या कोटाच्या भिंतीलगत १७ फूट मोकळे सोडून पुढे दुकान लावा. पण पुढील अतिक्रमणे काढल्यावर व १७ फूट देवस्थानची जागा सोडल्यावर दुकानच राहात नाही. म्हणजे मंदिरासमोरदेखील भकास वातावरण झाले आहे. मात्र प्रांताधिकाऱ्यांनीही कायदेशीरपणे उत्तर दिले. ते म्हणाले, येणाऱ्या सिंहस्थात चेंगराचेंगरी होऊ नये, यात्रेकरुंना सुलभपणे चालता यावे या हेतूनेच आम्ही केवळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करीत आहोत, असे स्पष्टीकरण केले. यावेळी अनेकांनी शाही मार्गापुरती मोहीम सुरू ठेवण्याची मागणी केली व सध्याची सुरू असलेली मोहीम बंद करावी, अशी मागणी केली. पण प्रांताधिकाऱ्यांनी कोणाचाच सल्ला मानला नाही ते आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. (वार्ताहर)
अतिक्रमण मोहिमेच्या निषेधार्थ त्र्यंबकेश्वर बंद
By admin | Published: May 16, 2015 11:23 PM