पंचवटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी तपोवनातील साधुग्राम येथे आलेल्या कार्यकर्त्यांना आश्विन महिन्यात श्रावणातील त्र्यंबकेश्वर फेरीचा अनुभव आला. वरुणराजाने दुपारपासूनच हजेरी लावल्याने मोदींची सभा होते की नाही याबाबत साशंकता होती. पावसाने कधी उघडीप, तर कधी दमदारपणे हजेरी लावली तरी नागरिकांनी भरपावसात सभेच्या ठिकाणी गर्दी केली होती. ज्याठिकाणी सभा होती ती शेतजमीन असल्याने पावसाच्या पाण्यामुळे जमीन चिखलमय झाली होती. या चिखलातून सभेच्या ठिकाणी जाईपर्यंत नागरिकांना त्र्यंबकेश्वरच्या श्रावण फेरीचा अनुभव आला. ज्यांनी पायात बूट घातलेले होते त्यांना बूट जड झाले होते, तर सॅँडल, चप्पलवाल्यांचे मोठे हाल झाले. चिखल तुडवत सभास्थळी जाईपर्यंत अनेकांना चप्पल आणि बूट हातात घेऊन मार्गक्रमण करावे लागत असल्याचे दिसून आले. तपोवनातील जनार्दनस्वामी आश्रमाकडून नागरिकांना प्रवेश दिल्याने सभास्थळापर्यंत जाण्यासाठी त्यांना चिखल तुडवितच जावे लागले, तर अनेकांनी चिखल पाहून घराकडे माघारी फिरणे पसंत केले. चिखलातून मार्गक्रमण करीत सभेच्या ठिकाणी जाण्याचे टाळून अनेकांनी मुख्य रस्त्यावर थांबून ध्वनिक्षेपकावरूनच मोदींचे भाषण ऐकणे पसंत केले. (वार्ताहर)
श्रावणातील त्र्यंबकेश्वर फेरीचा अनुभव
By admin | Published: October 08, 2014 1:43 AM