त्र्यंबकेश्वर : येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियान फक्त कागदावरच असून गावातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी घाणीचे ढीग तसेच रस्त्यावर अस्ताव्यस्त मारलेला झाडू पाहता ही स्वच्छता की स्वच्छतेचे नाटक असल्याची शंका उपस्थित होत आहे.गावातील सफाईचा ठेका एका खासगी कंपनीला दिला आहे. त्या कंपनीमार्फत गावातील सार्वजनिक स्वच्छतागृह, गटारी, रस्ते साफसफाई, मृत प्राणी, जनावरे उचलणे, ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टिकची विल्हेवाट आदी कामे केली जातात, पण यापैकी कोणतीच कामे धड केली जात नाहीत. घंटागाडी येण्याची निश्चित वेळ नाही. आली तरी ओला कचरा, सुका कचरा महिलांच्या हातून घंटागाडीत टाकला जातो व निम्मा कचरा रस्त्यावरच सांडला जातो. कचरा संकलन झाल्यावर घंटागाडी निघून गेली, की रस्त्यावर सांडलेला कचरा तसाच पडून इतरत्र पसरतो.थोडक्यात, घंटागाडी येऊन गेल्यावर त्या भागात रस्त्यावर घाण पसरली जाते, असे चित्र पाहायला मिळते. मात्र, पालिकेकडून बिले वेळेवर वसूल केले जातात. प्रत्यक्षात दररोज किती गटारी, स्वच्छतागृह स्वच्छ केले जातात व किती मृत जनावरे उचलले जातात याबाबतची निश्चित माहिती स्वच्छतेचा अधिभार सोपविलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनादेखील माहीत नाही. पालिकेतील स्वच्छता निरीक्षक पी. बी. बडगुजर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेची स्वच्छता निरीक्षकाची जागा अजूनही रिक्तच आहे. त्यामुळे स्वच्छता ठेकेदाराच्या विश्वासावरच गावातली स्वच्छता वाऱ्यावर आहे.दर महिन्याला ठेकेदाराला लाखो रुपयाचे बिल मिळूनही खरे सफाई कामगार पुरेशा वेतनाअभावी वंचितच राहतात. ऊन, वारा व पावसात काम करणाऱ्या ठेका कर्मचाऱ्यांना अल्प मोबदला दिला जातो. त्यातही वेळेवर पगार दिला जात नसल्याने काही वेळेला कामबंद आंदोलन करण्याची पाळी कर्मचाऱ्यांवर येत असते.मेनरोड परिसरातील एक महिला पदाधिकारी (पाणीपुरवठा सभापती) शीतल उगले यांनी स्वतः त्यांच्या प्रभागापुरती घंटागाडी, त्यावरील चालक, स्वच्छता कर्मचारी यांच्यासह स्वतंत्रपणे सफाई, कचरा उचलण्याचे काम सुरू केले आहे. गावात लोक राजरोसपणे घंटागाडी येत असताना कुठेही कचरा फेकतात. शिळे अन्न, खरकटे पाणी ओहळात फेकले जाते. त्यामुळे गावात अनेक ठिकाणी कुठेही कचऱ्याचे ढीग जमा झालेले दिसता, त्याकडे स्वच्छता विभाग दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त केली जात आहे.
त्र्यंबकेश्वरला 'स्वच्छ सर्वेक्षण अभियान २०२१' फक्त फलकांवरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 5:54 PM
त्र्यंबकेश्वर : येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियान फक्त कागदावरच असून गावातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी घाणीचे ढीग तसेच रस्त्यावर अस्ताव्यस्त मारलेला झाडू पाहता ही स्वच्छता की स्वच्छतेचे नाटक असल्याची शंका उपस्थित होत आहे.
ठळक मुद्देगावात अनेक ठिकाणी कुठेही कचऱ्याचे ढीग जमा झालेले दिसतात.