त्र्यंबकेश्वर/मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकराजाच्या प्रवेशद्वाराबाहेरील पायरीसमोर जाऊन दर्शन घेतले. यावेळी दलवाई यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले व सामाजिक सलोखा तोडण्याचे हे षड्यंत्र असल्याचे सांगितले. त्र्यंबकवासीयांनी सहिष्णुता दाखवत एकीचे दर्शन घडविल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. त्र्यंबकेश्वर मंदिरात अन्य धर्मीयांकडून प्रवेश करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटले. या वादावर संबंधित अन्य धर्मीयांकडून पडदा टाकला गेला असतानाच गुरुवारी हुसेन दलवाई यांनी त्र्यंबकेश्वर शहरात येऊन लक्ष वेधले. भोसले, दवे, राणेंचीच एसआयटी चौकशी करा : पटोलेत्र्यंबकेश्वरला धूप दाखवण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली असून, गावातील वातावरण शांत असल्याचे स्थानिकांकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतरही जाणीवपूर्वक वादाचा रंग देऊन वातावरण बिघडवण्याचे काम केले जात आहे. महाराष्ट्रात जातीय तणाव वाढवून दंगली घडवण्याचे षड्यंत्र भाजप आणि त्यांच्याशी संलग्न संघटना करत आहेत. अनाचार्य भोसले, हिंदू महासभेचा आनंद दवे, आमदार नितेश राणे यांच्यासह ज्यांनी त्र्यंबकेश्वरचे वातावरण बिघडवण्यास खतपाणी घातले, चिथावणी दिली त्यांचीच चौकशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या एसआयटीने करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी केली.
सय्यद कुटुंबीयांची विचारपूस दलवाई यांनी गुलाबशावली बाबा दर्ग्याचे सेवेकरी सय्यद कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी दर्ग्यालाही भेट दिली. शंभर वर्षांची परंपरा असताना यापूर्वी कधी असे घडले नव्हते. मात्र, आताच असा प्रकार का घडावा याबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली. दरम्यान, सलीम सय्यद यांना या प्रकरणाचा धक्का बसल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.