संजय पाठक, नाशिक- बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर जवळ ब्रह्मगिरी येथे मोठ्या प्रमाणात बांधकामे होऊ लागली आहे. या संदर्भात पुण्यातील राष्ट्रीय हरित लवादात दाखल याचिकेत जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला असून त्रंबकेश्वर गाव हे इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तसेच येथील बांधकामही त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या परवानगीनेच होत असल्याचे सांगितल्याने पर्यावरण वाद्यांना धक्का बसला आहे.
त्र्यंबकेश्वर परिसरातील ब्रह्मगिरी हे गोदावरी नदीचे उगमस्थान असून गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी बांधकामी सुरू लागले बऱ्याच ठिकाणी रिसॉर्ट होत आहे. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेने या बांधकामांना परवानगी दिली असली तरी या बांधकामांमुळे जैवविविधता नष्ट होऊ शकते. तसेच ब्रह्मगिरीला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यापूर्वीही पर्यावरण कार्यकर्त्यांनी बांधकामे आणि उत्खननाला विरोध केला होता. माजी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी त्र्यंबकेश्वर परिसर इको सेन्सिटिव्ह झोन जाहीर करणार असल्याची सांगितले होते. दरम्यान, या भागात बांधकामे सुरू झाल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना संयुक्त पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश हरित लवादाने दिले होते.
हा अहवाल नुकताच सादर करण्यात आला असून यात त्र्यंबकेश्वर गाव हे इको सेंसिटिव्ह झोन मध्ये नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या परवानगीनेच बांधकामे करण्यात येत असल्याचे अहवालात नमूद केल्याने या बांधकामांना अभय मिळाले आहे. दरम्यान याचिकाकर्त्या ललिता शिंदे यांनी अहवाला विषयी नाराजी व्यक्त केली असून या संदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.