लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : ब्रह्मगिरी अर्थात सह्याद्रीच्या पर्वतराजीतील विनायक खिंडीत रविवारी सकाळी दरड कोसळली. यात आनंदा काशीराम गमे (२७) या तरु णाचा जागीच मृत्यू झाला.विनायक खिंड हा भाग त्र्यंबकच्या ग्रामीण भागात येत असून, विनायक खिंड वसाहतीत बरेच लोक वास्तव्यास आहे. आज सकाळी सहा ते साडेसहा वाजेदरम्यान आनंदा गमे हा तरुण गायी चरावयास सोडून परत येत असताना दरड कोसळली. यात एक मोठा दगड आनंदाच्या छातीच्या भागात लावला तसा तो फेकला जाऊन दुसऱ्या दगडावर जाऊन आदळला. डोक्याला दगडाचा जबर मार लागल्याने यात आनंदचा मृत्यू झाला. शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरडी ढिसूळ होऊन मोठा दगड पडला असावा असे बोलले जात आहे. पावसाळ्यात अजूनही दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वरचे तलाठी सत्यजित गोसावी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्र्यंबक पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. उशिराने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार महेंद्र परिवार यांनी मृताच्या घरी जाऊन सांत्वन केले. नातेवाइकांना मदत निधी देण्याचे जाहीर करण्यात आले.
त्र्यंबकेश्वरला दरड कोसळून तरुण ठार
By admin | Published: June 05, 2017 12:29 AM