त्र्यंबकेश्वर : शहराची लोकसंख्या जेमतेम ११ हजार, वर्षाचे अंदाजपत्रक १३ कोटी, क्षेत्रफळ तर एखाद्या ग्रामपंचायतीचे असावे इतके छोटे, उत्पन्नाचे स्रोतही मर्यादित; परंतु तरीही निवडणूक म्हटली की होणारा खर्च तोंडात बोटे घालायला लावणारा... ज्या ब्रह्मगिरीतून गोदावरी नदी उगम पावली, तेथेच आर्थिक गंगाही इतकी प्रवाही असल्याचे बघून भलेभलेही थक्क व्हावे आणि नाशिक महापालिकेच्या निवडणुकीतील खर्चिक उमेदवारांनी माघार घ्यावी अशा खर्चाची क्षमता असलेले उमेदवार, त्यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणूक समस्या आणि विकासापेक्षा आर्थिक मुद्द्यांभोवतीच फिरत असून, भाव किती फुटणार याचीच चर्चा अधिक असते.विशेषत: गेल्या काही दिवसांतच उमेदवारांनी हात ढिले सोडल्याने सात हजार रुपये प्रति मत असा सांप्रतचा भाव चर्चेत असून, मतदानाच्या दिवशी हा भाव आणखीनच वधारेल, असे स्थानिक जाणकार सांगत आहेत. गेल्यावेळी एका वॉर्डात एका उमेदवाराने अखेरच्या तीन तासांत पंचवीस हजार रुपये असा भाव फोडला होता. त्यामुळे आता अखेरच्या दिवशी मार्केट किती वाढेल हे सांगणे कठीण आहे, असे काही नागरिक सांगतात. त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्र असल्यानेच क्षमता नसतानाही येथे नगरपालिका स्थापन झाली. पुरेशी लोकसंख्या नाही आणि केवळ धार्मिक पर्यटन यावरच गावाचे अर्थकारण असल्याने नगरपालिकेला कधीही उत्पन्नाचे स्रोत सापडले नाही. परंतु स्थानिक स्तरावर मात्र धार्मिक पर्यटनातून पैसा खेळू लागला आहे. ही आर्थिक समृद्धी अनेकांच्या डोळ्यात खुपणारी असल्याचे स्थानिक नागरिकांचे मत असले तरी तीच निवडणुकीत समृद्धी निर्माण करणारी ठरते. गेल्या काही वर्षांपासून त्र्यंबकेश्वरच्या आसपासच्या जमिनींना भाव आल्याने त्याचे व्यवहार करणारेदेखील राजकारणात पैसा गुंतवू लागले आणि त्यामुळे प्रतिष्ठेच्या मोहापायी निवडणुकीत नोटांची गंगा वाहू लागली. गेल्या दोन ते तीन निवडणुकीत हे चित्र पार पालटून गेले आहे. त्र्यंबकमधील उमेदवारांची ही समृद्धी प्रमुख राजकीय पक्षांच्या इतकी पथ्यावर पडली आहे की, यंदा तर प्रत्येक उमेदवाराला खर्च किती करणार अशा बोली लावूनच उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्यातून निष्ठावंतांत न्याय आणि अन्यायाच्या भावना खदखदत असून, निवडणुकीत हेच उट्टे काढण्यासाठी सज्ज असल्याने निवडणुकीचे निकाल काही प्रमाणात तरी आर्थिक व्यवहारापलीकडे उलटफेर करणारे ठरू शकतात, असेही येथील जाणकार सांगतात. निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यापासूनच त्र्यंबकेश्वरात मतदारांची चांदी होण्यास सुरुवात झाली.दिवाळी भेटीचे निमित्त करून सुगंधित उटणे, साबण, अत्तराच्या फायापासून महागड्या साड्यांपर्यंत भेट म्हणून देण्यास सुरुवातझाली आहे. त्यानंतर आता तर निवडणुकीत उमेदवार मिळविण्यासाठी राजकीय पक्षांनी मांडलेल्या लिलावाचे आकडेही थक्क करणारे ठरत आहेत.
त्र्यंबकेश्वर पालिका निवडणूक आख्यान : प्रतिष्ठेच्या मोहापायी वाहते नोटांची गंगा कुशावर्तगावी ‘अर्थ’तीर्थ; ‘भाव’ समजोनी घ्यावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 12:07 AM
शहराची लोकसंख्या जेमतेम ११ हजार, वर्षाचे अंदाजपत्रक १३ कोटी, क्षेत्रफळ तर एखाद्या ग्रामपंचायतीचे असावे इतके छोटे, उत्पन्नाचे स्रोतही मर्यादित; परंतु तरीही निवडणूक म्हटली की होणारा खर्च तोंडात बोटे घालायला लावणारा.
ठळक मुद्देनिवडणूक विकासापेक्षा आर्थिक मुद्द्यांभोवतीच पंचवीस हजार रुपये भाव फोडला