त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेचा कचरा डेपो चार दिवसांपूर्वी घाणकचऱ्याने ओसंडून वाहत होता. कचऱ्याचे ढीग साचलेले होते. त्यामुळे दुर्गंधी सुटलेली होती. कंपोस्ट खत वगळता उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावावी, कशी असा प्रश्न नगर परिषदेपुढे असतानाच तळवाडे येथील शेतकरी अंकुश बोडके यांनी स्वखर्चाने विनामोबदला हा कचरा घेऊन जाण्याची तयारी दर्शवली आणि ओसंडून वाहणारा कचरा डेपो मोकळा झाला.
दरम्यान, जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी नुकतीच खत प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. त्र्यंबक नगर परिषदेचा कचरा डेपो चार दिवसांपूर्वी अक्षरशः भरलेला होता. चिंध्या, कपडे जमिनीत गाडले गेले तर त्याचे उत्तम खत निर्माण होते. नेमकी ही बाब तळवाडे येथील शेतकरी अंकुश बोडके यांनी हेरली आणि सर्व चिंध्या व तयार होत असलेला खतवजा कचरा ट्रकमध्ये भरून नेत स्वत:च्या शेतावर नेला. त्यामुळे कचरा डेपो मोकळा झाला.
पालिकेला असा कचरा नेणारा व डेपो मोकळा करून देणारा शेतकरी हवाच होता. त्यासाठी विनामोबदला हा कचरा देण्याची तयारी नगर परिषदेने दर्शवली होती. तळवाडे येथील शेतकरी अंकुश बोडके पालिकेला योगायोगाने भेटले आणि संपूर्ण कचरा त्यांनी स्वखर्चाने वाहून नेला. तीन दिवसात कंपोस्ट खत प्रकल्प वगळता डेपो मोकळा करण्यात आला.इन्फोपालिकेच्या गंगाजळीत भरत्र्यंबकला दररोज १० ते १५ ट्रॅक्टर ओला व सुका कचरा घंटागाडीद्वारे कचरा डेपोत वाहून आणला जातो. तसेच गावातील हॉटेल्स, खाणावळमधील शिळे, उष्टे अन्न टेम्पोत भरून तळवाडे येथील बायोगॅस प्रकल्पावर पाठविले जाते. गावातील लोकांकडून ओला व सुका कचरा विलगीकरण करूनच घंटागाडीत स्वीकारला जातो. कचरा डेपोत चिंध्यांचे गठ्ठे बांधले जातात. प्लॅस्टिकच्या वस्तू प्लॅस्टिक वितळविण्याच्या कंपनीत पाठविले जातात. चिंध्या खड्ड्यात टाकून बुजवल्या की त्याच्या पासून खत तयार होते. देवस्थानच्या निर्माल्यापासूनही सेंद्रिय खत तयार होते. हेच सेंद्रिय खत विकून पालिकेच्या गंगाजळीत अल्पशी का होईना भर पडत असते.